वाळूजमहानगर : भरधाव जाणाऱ्या खासगी स्कूल बसने मनपाच्या स्मार्ट सिटी बसला धडक दिल्याची घटना सोमवार, 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास वाळूज महानगरातील स्टरलाईट चौकात घडली.

वाळूजमहानगर : भरधाव जाणाऱ्या खासगी स्कूल बसने मनपाच्या स्मार्ट सिटी बसला धडक दिल्याची घटना सोमवार, 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास वाळूज महानगरातील स्टरलाईट चौकात घडली. या अपघातात स्कूल बसमधील तीन विद्यार्थी तर स्मार्ट सिटी बसमधील एक प्रवासी आणि वाहक जखमी झाला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या सूत्रांनी दिली.
छत्रपती संभाजीमहानगर महापालिकेची स्मार्ट सिटी बस क्रमांक (एमएच-20-ईएल-0279) ही जोगेश्वरी येथून चिकलठाण्याकडे जात होती. तर पोद्दार इंग्लीश शाळेची स्कूल बस क्रमांक (एमएच-20-जीसी-0997) ही शाळेतून विद्यार्थी घेऊन बजाजनगर येथे त्यांना घरी सोडण्यासाठी स्टरलाईट कंपनीसमोरुन वळण घेत होती. त्यावेळी बसचालकाने भरधाव बस चालवून समोरुन वळण घेत असलेल्या स्मार्ट सिटी बसला धडक दिली. या अपघातात स्कूल बसमधील विराज माने, शिवांश यादव, स्वाराज देशमुख हे तीन चिमुकले विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. तर अन्य 15 ते 16 विद्यार्थी घाबरुन कावरेबावरे झाले होते. तसेच स्मार्ट सिटी बसच्या दारात उभा असलेला एक प्रवासी खाली पडून जखमी झाला. तर बसचा वाहक कृष्णा बोडखे हा बसच्या बोनेटवर पडल्याने त्यांच्या कंबरेला मार लागला. या अपघाताची माहिती मिळताच वडगाव कोल्हाटी- बजाजनगरच्या उपसरपंच ज्योती साळे, श्रीकांत साळे, एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दिनेश बन, पोलिस अंमलदार यशवंत गोबाडे यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. तसेच त्यांनी लहान मुलांना धीर दिला.