वाशिम : शहरात कर्णकर्कश हॉर्न वाजवून तसेच मॉडिफाय सायलन्सर लावून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांविरोधात शहर वाहतूक शाखेने शुक्रवारी धडक कारवाई केली. विशेष मोहिमेद्वारे चारचाकी व अवजड वाहनांसह एकूण १० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

१६ मे रोजी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत विशेषतः दुचाकींना मॉडिफाय सायलन्सर लावून मोठ्या आवाजात वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांना लक्ष्य करण्यात आले. तसेच कर्णकर्कश हॉर्नचा वापर करणाऱ्या वाहनांवरही कारवाई करण्यात आली. वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन वाहतूक विभागाने ही मोहीम हाती घेतली.
वाहतूक शाखेकडून ही मोहीम यापुढेही वेळोवेळी राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. नागरिकांनी अशा प्रकारे कर्कश हॉर्न किंवा मॉडिफाय सायलन्सरचा वापर करणारी वाहने आढळल्यास शहर वाहतूक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब किसनराव नाईक यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत पोलीस अंमलदार सुनिल वाणी, दिपक मुळे, विष्णु साबळे, राहुल गवई, शिवकुमार घुगे, प्रविण जाधव तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल मनीषा चौके, ज्योती इंगोले व शालू इंगळे यांनी सहभाग घेतला.