कारंजा (लाड) : आंबे खरेदीसाठी काही क्षण कारमधून खाली उतरले आणि क्षणार्धात कारमधील २० लाख रुपयांची रोकड गायब झाली! कारंजा शहरात भरदिवसा घडलेल्या या धाडसी चोरीने व्यापारी वर्ग हादरला असून, बँकेतून मोठी रक्कम काढणाऱ्या व्यापाऱ्यांवर पाळत ठेवून त्यांना लक्ष्य करणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्याचे समोर आले आहे.

कारंजा (लाड) : आंबे खरेदीसाठी काही क्षण कारमधून खाली उतरले आणि क्षणार्धात कारमधील २० लाख रुपयांची रोकड गायब झाली! कारंजा शहरात भरदिवसा घडलेल्या या धाडसी चोरीने व्यापारी वर्ग हादरला असून, बँकेतून मोठी रक्कम काढणाऱ्या व्यापाऱ्यांवर पाळत ठेवून त्यांना लक्ष्य करणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. जुन्या बायपास रस्त्यावरील हॉटेल राधाकृष्ण समोर १८ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घडली.
चेतन अरुण हेडा (रा. मानोरा) असे फिर्यादी व्यापाऱ्याचे नाव असून, ते मानोरा येथील प्रतिष्ठित कृषी व्यापारी आहेत. त्यांचा स्वतःचा खाजगी कृषी बाजार आहे. व्यावसायिक व्यवहारासाठी त्यांनी कारंजा येथील ॲक्सिस बँकेच्या शाखेतून २० लाख रुपये रोख काढले होते. त्यानंतर ही रक्कम कारमध्ये ठेवून ते जुन्या बायपास रस्त्याने जात असताना, हॉटेल राधाकृष्ण समोर आंबे खरेदी करण्यासाठी थांबले. हेडा कारमधून खाली उतरताच, आधीपासूनच दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी काही सेकंदांत कारची काच फोडली आणि आतील रोकड घेऊन पोबारा केला. संपूर्ण प्रकार इतक्या वेगाने आणि शिताफीने घडला की, व्यापाऱ्याला काही समजण्याच्या आतच चोरटे पसार झाले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक तपासात, व्यापाऱ्याने बँकेतून एवढी मोठी रक्कम काढल्याची माहिती चोरट्यांना आधीपासूनच असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. बँकेतून बाहेर पडल्यापासूनच संशयित टोळीने व्यापाऱ्याच्या हालचालींवर पाळत ठेवली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. व्यापारी गाडीपासून दूर होताच चोरट्यांनी डाव साधल्याने ही चोरी पूर्णपणे नियोजनबद्ध असल्याचे स्पष्ट होत आहे.
घटनेची माहिती मिळताच कारंजा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून परिसरातील दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने तसेच हायवेवरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. चोरट्यांचा माग काढण्यासाठी विविध पथके सक्रिय करण्यात आली असून तपास युद्धपातळीवर सुरू आहे.


