कारंजा (लाड) : शेलूबाजारजवळील तपोवन फाट्यावर बुधवारी (१४ ऑक्टोबर) दुपारी दोन दुचाकींची भीषण धडक होऊन कारंजा नगर परिषदेच्या दोन मुख्याध्यापकांसह तिघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कारंजा शहरातील शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

कारंजा (लाड) : शेलूबाजारजवळील तपोवन फाट्यावर बुधवारी (१४ ऑक्टोबर) दुपारी दोन दुचाकींची भीषण धडक होऊन कारंजा नगर परिषदेच्या दोन मुख्याध्यापकांसह तिघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कारंजा शहरातील शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
या अपघातात कारंजा नगर परिषद संचालित उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक १ चे मुख्याध्यापक सैय्यद आबीद हुसैन सैय्यद रऊफ (वय ५६) आणि उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक २ चे मुख्याध्यापक नाझीम मोहम्मद नूर मोहम्मद (वय ५७) यांच्यासह दुसऱ्या दुचाकीवरील चालकाचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मुख्याध्यापक शाळेच्या संचमान्यतेच्या कामासाठी कारंजा येथून वाशिमच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयाकडे दुचाकीने जात होते. दरम्यान, तपोवन फाट्याजवळ समोरून येणाऱ्या बजाज पल्सर दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.शालेय कामानिमित्त प्रवास करत असताना दोन्ही मुख्याध्यापकांचा मृत्यू झाल्याने शिक्षकवर्गातून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे कारंजा नगर परिषद आणि शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
—
लोकप्रतिनिधी, शिक्षकांची घटनास्थळी धाव
अपघाताची माहिती मिळताच कारंजा नगर परिषदेचे गटनेते बिलाल पुंजानी, उपाध्यक्ष ॲड. फिरोज शेकुवाले, शिक्षण सभापती जाकीर शेख, नियोजन सभापती नदीम राज तसेच मृतांचे नातेवाईक व शिक्षक घटनास्थळी पोहोचले. पुढील कार्यवाहीसाठी तिघांनाही मंगरूळपीर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.


