वाशिम : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी वाशिम जिल्ह्यात शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) शांततेत आणि उत्साहात मतदान पार पडले. जिल्ह्यातील सातही मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण झाली. जिल्ह्यातील ३ हजार ७१५ नोंदणीकृत मतदारांपैकी ३ हजार ५३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे जिल्ह्यात ९५.१३ टक्के मतदानाची नोंद झाली. केंद्रनिहाय आकडेवारीत रिसोड येथे सर्वाधिक ९६.६२ टक्के, तर मानोरा येथे सर्वांत कमी ९१.४८ टक्के मतदान झाले.

रिसोडमध्ये सर्वाधिक मतदान; सातही केंद्रांवर प्रक्रिया शांततेत पूर्ण
वाशिम : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी वाशिम जिल्ह्यात शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) शांततेत आणि उत्साहात मतदान पार पडले. जिल्ह्यातील सातही मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण झाली. जिल्ह्यातील ३ हजार ७१५ नोंदणीकृत मतदारांपैकी ३ हजार ५३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे जिल्ह्यात ९५.१३ टक्के मतदानाची नोंद झाली. केंद्रनिहाय आकडेवारीत रिसोड येथे सर्वाधिक ९६.६२ टक्के, तर मानोरा येथे सर्वांत कमी ९१.४८ टक्के मतदान झाले.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील शिक्षक मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. मतदान सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी कमी होती; मात्र जसजसा दिवस पुढे सरकत गेला, तसतसा मतदानाचा वेग वाढला. सकाळपासूनच विविध मतदान केंद्रांवर मतदारांची उपस्थिती दिसून आली. जिल्ह्यात सकाळी १० वाजेपर्यंत १६.८२ टक्के मतदान झाले होते. दुपारी १२ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ३६.०२ वर पोहोचली. त्यानंतर मतदानाचा वेग वाढत दुपारी २ वाजेपर्यंत ६४.०२ टक्के मतदान झाले. दुपारी ४ वाजता मतदानाची वेळ संपल्यानंतर अंतिम आकडेवारीनुसार ९५.१३ टक्के मतदान नोंदविण्यात आले.
जिल्ह्यातील एकूण ३ हजार ७१५ मतदारांपैकी ३ हजार ५३४ मतदारांनी मतदान केले. यामध्ये २ हजार ७५९ पुरुष आणि ७७५ महिला मतदारांचा समावेश आहे. पुरुष मतदारांची मतदानाची टक्केवारी ९५.३४, तर महिला मतदारांची टक्केवारी ९४.४० इतकी होती. पुरुष आणि महिला या दोन्ही गटांतील मतदानाची टक्केवारी ९४ टक्क्यांपेक्षा अधिक राहिली.मतदानाची टक्केवारी झपाट्याने वाढली आणि अखेर जिल्ह्यात ९५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले.जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेतील समन्वयामुळे वाशिम जिल्ह्यातील सातही मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली. उच्च मतदानाच्या टक्केवारीमुळे या निवडणुकीत शिक्षक मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
—
जिल्हाधिकाऱ्यांकडून केंद्रांची पाहणी
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले होते. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था, मतदारांसाठी उपलब्ध सुविधा आणि मतदान प्रक्रियेचा त्यांनी आढावा घेतला. मतदान प्रक्रियेदरम्यान आवश्यक समन्वय राखण्यावर प्रशासनाचा भर होता.
—
चोख पोलीस बंदोबस्त
निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १५ पोलीस अधिकारी, २२८ पोलीस अंमलदार आणि १४ होमगार्ड तैनात करण्यात आले होते. मतदानाच्या कामासाठी सात मतदान केंद्राध्यक्ष तसेच प्रथम, द्वितीय आणि तृतीय मतदान अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. याशिवाय राखीव कर्मचाऱ्यांचीही व्यवस्था करण्यात आली होती.
—
मतदान केंद्र मतदानाची टक्केवारी
वाशिम – केंद्र क्र. ५७ ९५.६६
वाशिम – केंद्र क्र. ५८ ९६.४१ मंगरूळपीर ९५.१३
रिसोड ९६.६२
मालेगाव ९४.७०
कारंजा ९३.९५
मानोरा ९१.४८


