वाशिम : सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत युवकाच्या वडिलांकडून तब्बल १ लाख ७३ हजार रुपये उकळून बनावट नियुक्तीपत्र देत फसवणूक करणाऱ्या भामट्यावर वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ कारवाई करत फरार आरोपीला ताब्यात घेतले.

फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात
वाशिम : सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत युवकाच्या वडिलांकडून तब्बल १ लाख ७३ हजार रुपये उकळून बनावट नियुक्तीपत्र देत फसवणूक करणाऱ्या भामट्यावर वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ कारवाई करत फरार आरोपीला ताब्यात घेतले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भगवान चांगदेव वानखडे यांनी १५ मे २०२६ रोजी वाशिम शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी रमेश रामकृष्ण नवघरे (वय ४७, रा. पार्डी आसरा, ता. जि. वाशिम) याने पंचायत समिती वाशिम येथे ‘पॅनल टेक्निकल ऑफिसर’ पदावर फिर्यादीच्या मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी वेळोवेळी फिर्यादीकडून १ लाख ७३ हजार रुपये घेतले. तसेच कारंजा पंचायत समितीचे बनावट नियुक्तीपत्र देऊन फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध वाशिम शहर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ५५५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी सपोनि जगदीश बांगर, पोउपनि निलेश जाधव यांच्यासह विशेष पथक तयार करून आरोपीच्या शोधासाठी रवाना केले. आरोपी वाशिममध्ये आल्याची गोपनीय माहिती मिळताच पथकाने पवन हॉटेल परिसरातून त्याला ताब्यात घेत अटक केली. पुढील तपास पोउपनि निलेश जाधव करीत आहेत.
दरम्यान, पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नोकरी संदर्भातील माहिती केवळ संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच तपासावी, तसेच नोकरीच्या नावाखाली कोणी पैशांची मागणी केल्यास कोणताही आर्थिक व्यवहार न करता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे त्यांनी म्हटले आहे.