जालना : जालना शहरात प्रशासन हादरवणारी घटना घडली आहे. जालना महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तब्बल दहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई गुरुवार, 16 रोजी मोतीबाग परिसरात असलेल्या त्यांच्या शासकीय निवासस्थानी सायंकाळी उशिरा करण्यात आली.

जालना : जालना शहरात प्रशासन हादरवणारी घटना घडली आहे. जालना महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तब्बल दहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई गुरुवार, 16 रोजी मोतीबाग परिसरात असलेल्या त्यांच्या शासकीय निवासस्थानी सायंकाळी उशिरा करण्यात आली.या कारवाईमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका तक्रारदाराकडून प्रशासकीय काम सोडवून देण्यासाठी आयुक्तांनी दहा लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल केली. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.
कारवाईदरम्यान आयुक्तांनी कथित लाच स्वीकारल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. सध्या या प्रकरणाचा तपास लासलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. या प्रकरणानंतर जालना महानगरपालिकेत आणि शहरात चर्चेला उधाण आले आहे. आयुक्त स्तरावरील अधिकाऱ्यावर झालेल्या कारवाईमुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी ही कारवाई स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर कर्मचारी वर्गात मात्र खळबळ माजली आहे.
रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पहिलीच मनपा; पहिलाच आयुक्त !
दोन वर्षांपूर्वी जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर करण्यात आले. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक राज आल्यामुळे जालना महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त म्हणून तत्कालीन मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांचीच नियुक्ती करण्यात आलेली होती. जालना महानगरपालिकेचे पहिले आयुक्त होण्याची संधीही खांडेकर यांना मिळाली होती. मात्र, गुरुवारी ते लाच घेताना पकडल्या गेल्यामुळे पहिलेच आयुक्त लाचखोरीत अडकले. यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
एसीबी कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी
रात्री उशिरापर्यंत एसीबीच्या कार्यालयात कारवाई सुरू होती. दरम्यान यावेळी कार्यालयासमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी काही नागरिकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.
