मालेगाव : तालुक्यातील ढोरखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता दत्तात्रय (बबन) मिटकरी यांना २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी (दि. ४) रंगेहात पकडले. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ढोरखेडा ग्रामपंचायतीच्या प्रतिमेला धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतीअंतर्गत सुमारे ४.५ लाख रुपयांच्या नाली बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी १० टक्के लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर २५ हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर ३ जून रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ४ जून रोजी एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे २५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच सरपंच मिटकरी यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले.
विशेष म्हणजे, ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत ढोरखेडा ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे मूल्यांकन सुरू असतानाच ही कारवाई झाली. तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळाल्याने ग्रामपंचायतीची उच्चस्तरीय तपासणी सुरू होती. त्याचवेळी सरपंच लाच स्वीकारताना पकडल्याने उपस्थित अधिकारी व ग्रामस्थांमध्ये एकच चर्चा रंगली.
याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून एसीबीकडून पुढील तपास केला जात आहे. या कारवाईमुळे ग्रामपंचायत प्रशासनातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.