कर्जमाफीच्या क्लिपद्वारे सरकारची पोलखोल : अंबादास दानवे 

तळणी : विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने हवेत विरली असून, सरकारने जनतेशी फसवणूक केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. 

तळणी : विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने हवेत विरली असून, सरकारने जनतेशी फसवणूक केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. 

   शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ‘क्या हुआ तेरा वादा?’ या राज्यव्यापी आंदोलनाअंतर्गत परतूर-मंठा विधानसभा क्षेत्रातील मंठा तालुक्यातील वैद्य वडगाव येथे शनिवारी आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कर्जमाफीसंदर्भातील जुन्या ऑडिओ क्लिप ऐकवून सरकारची वचनभंगाची पोलखोल केली.

“महायुती सरकारने निवडणुकीआधी मोठमोठ्या घोषणा केल्या, पण सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी एकही ठोस काम केले नाही,” असा आरोप करत दानवे म्हणाले, ४५ हजार गावांना पाणंद रस्ते देण्याचे आश्वासन केलं होतं, पण आजही शेतकऱ्यांना चिखल तुडवत जावं लागतं. पाणंद रस्ते, गोठे, विहिरी यांसारखी कामे सरकारच्या भ्रष्टाचारामुळे थांबली आहेत.

या कार्यक्रमाला उपजिल्हाप्रमुख माधवराव कदम, नगरसेवक प्रदीप बोराडे, महेश नळगे, ज्ञानेश्वर सरकटे, आसाराम बोराडे, दासू खरात यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन अनंता वैद्य यांनी केले होते. प्रास्ताविक तालुका उपप्रमुख ज्ञानेश्वर सरकटे यांनी केले, तर सूत्रसंचालन बालासाहेब मोरे यांनी केले. शेकडो शेतकरी या संवादासाठी उपस्थित होते.

 अन्नदाता उर्जादाता कधी बनेल ? 

‘अन्नदाता बनेल उर्जादाता’ या घोषणेवरही टीका करत दानवे म्हणाले, “ही योजना फक्त कागदावरच आहे. प्रत्यक्षात शेतकरी आजही लोडशेडिंगच्या अंधारात जगतो आहे. अन्नदाता अजूनही उर्जादाता बनू शकलेला नाही. तो कधी उर्जादाता बनेल ? असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »