रिसोड : कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड येथे सोमवारी हळदीची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने पहाटेपासूनच शेतकरी व वाहनांची मोठी गर्दी झाली होती. विविध गावांमधून हळद विक्रीसाठी आलेल्या ट्रॅक्टर, पिकअप आणि मालवाहू वाहनांच्या लांबच लांब रांगा बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर लागल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

रविवारी रात्री उशिरापासूनच अनेक शेतकरी आपल्या वाहनांसह बाजार समिती परिसरात दाखल झाले होते. मात्र सकाळी सहा वाजूनही बाजार समितीचे मुख्य गेट उघडण्यात आले नव्हते. त्यामुळे थंडी आणि गैरसोयीमुळे अनेक शेतकऱ्यांना वाहनांमध्ये तसेच रस्त्यावरील डिव्हायडरवर झोपून रात्र काढावी लागली. गेट बंद असल्यामुळे वाहनांच्या रांगा वाढत गेल्याने परिसरातील वाहतुकीवरही परिणाम झाला. यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत वेळेत गेट उघडण्याची मागणी केली. हळदीची वाढती आवक लक्षात घेता नियोजनबद्ध व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात आली. त्यानंतर सकाळी उशिरा मुख्य गेट उघडण्यात आले आणि मालाची आवक प्रक्रिया सुरू करण्यात आली. दरम्यान, यंदा हळदीला अपेक्षित भाव मिळत नसल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. रिसोड बाजार समितीत हळद गटूला प्रतिक्विंटल १२ हजार ५०० रुपये, तर हळद कांडीला १३ हजार रुपये दर मिळाला. सोमवारी बाजार समितीत जवळपास सात हजार क्विंटल हळदीची आवक झाल्याची माहिती मिळाली आहे.
यंदा हळदीला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने हळदीचे दर वाढण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत. तसेच बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, निवारा, स्वच्छता व वेळेत प्रवेश व्यवस्था यांसारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
— सुभाष जाधव, शेतकरी, घोन्सर
शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी बाजार समितीकडून आवक प्रक्रिया सुरळीत करण्याचे प्रयत्न करण्यात आले. पुढील काळात वाढती आवक लक्षात घेऊन अधिक नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बाजार समिती कटिबद्ध आहे.
— विजय देशमुख, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, रिसोड