बुलढाणा : घरी कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत चोरीचा प्रयत्न केला. बुलढाणा शहरातील राजपूत ले- आऊट भागात शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

बुलढाणा : घरी कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत चोरीचा प्रयत्न केला. बुलढाणा शहरातील राजपूत ले- आऊट भागात शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
मुळचे म्हसाला येथील रहिवासी असलेले ह. भ. प. सागर महाराज भोंडे यांचे राजपूत ले-आऊट परिसरात घर आहे. हे घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरांनी घरात प्रवेश करत चोरीचा प्रयत्न केला. मात्र, घरात कोणतेही मौल्यवान दागिने किंवा रोख रक्कम न सापडल्याने चोरांच्या हाती काहीच लागले नाही.
रिकाम्या हाताने परत जावे लागल्याने संतापलेल्या चोरांनी घरातील साहित्याची नासधूस केली. घरातील धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचीही त्यांनी अस्ताव्यस्त पांगवापांगव करून ठेवली. सागर महाराज भोंडे यांचे नातेवाईक घरातील झाडांना पाणी देण्यासाठी गेले असता, घराचा दरवाजा उघडा असल्याचे आणि आतील साहित्य विखुरलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती सागर महाराज भोंडे यांना दिली. घटनेची माहिती मिळताच भोंडे यांनी म्हसाला येथून बुलढाण्याकडे धाव घेत घराची पाहणी केली. शहरात एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरात गेल्या चार-पाच दिवसांपासून चोरांनी धुमाकूळ घातला असून, रात्रीच्या सुमारास बंद घरे लक्ष्य केली जात आहेत. शहरातील वृंदावन नगर परिसरात चोरांची टोळी सक्रिय झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले होते.


