भोकरदन : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील एका फळ विक्रेत्याला मारहाण करून त्याच्या हातगाडीवरील फळे कचरा गाडीत भरण्याचा प्रताप नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी केला. या दांडगाईमुळे व्यवसायीकांनी नगरपरिषदेत मुख्य अधिकाऱ्यांना घेराव घालून कृत्याचा जाब विचारला. नंतर थेट पोलीस ठाणे गाठून तासभर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ नेहमीप्रमाणे काही फळविक्रेता आपली हातगाडी लावून व्यवसाय करत होते. त्यावेळी नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी आणि काही कर्मचारी अतिक्रमण व प्लास्टिक बंदीच्या नावाखाली कारवाई करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. फळ विक्रेत्यांनी केलेल्या आरोपानुसार, अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आणि समजून न सांगता, हातगाडीवरील सर्व ताजी फळे थेट कचरा गाड्यात टाकण्यास सुरुवात केली. फळविक्रेत्याने आपल्या नुकसानीबद्दल विचारणा केली असता, अधिकाऱ्यांनी त्याला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. या संदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून सबंधीत कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
या घटनेनंतर, पीडित व्यावसायिकांनी ही माहिती राजकीय पक्ष नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांना दिली. फळे कचरा गाडीत टाकणे, व्यावसायिकाचे मोठे नुकसान करणे आणि विशेषतः जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करणे यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर जोर देत पोलीस ठाण्यामध्ये तास भर ठिय्या आंदोलन करण्यात आले.