मालेगाव : पेट्रोल पंपावर डिझेलचे पैसे देताना वापरण्यात आलेल्या बनावट नोटांमुळे उघडकीस आलेल्या प्रकरणात मालेगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत सात आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून तब्बल २३ लाख ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा आणि एक इनोव्हा कार जप्त करण्यात आली असून या कारवाईमुळे बनावट चलन वापरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.

मालेगाव : पेट्रोल पंपावर डिझेलचे पैसे देताना वापरण्यात आलेल्या बनावट नोटांमुळे उघडकीस आलेल्या प्रकरणात मालेगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत सात आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून तब्बल २३ लाख ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा आणि एक इनोव्हा कार जप्त करण्यात आली असून या कारवाईमुळे बनावट चलन वापरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २९) सायंकाळी सुमारे ७ वाजता अमानी येथील विकास गवळी यांच्या पेट्रोल पंपावर आंध्र प्रदेश क्रमांकाची इनोव्हा कार (ए.पी. ०७ ए.सी. ४५५४) डिझेल भरण्यासाठी आली होती. वाहनचालकाने सुमारे दोन हजार रुपयांचे डिझेल भरल्यानंतर पैसे देताना एक हजार रुपयांच्या खऱ्या नोटांसोबत ५०० रुपयांच्या दोन नोटा दिल्या. मात्र त्या नोटांवर ‘भारतीय बच्चो का बैंक’ आणि ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ असे नमूद असल्याचे पंप कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले.
नोटांबाबत संशय निर्माण झाल्याने पंप कर्मचारी माधव केशव काटेकर यांनी तत्काळ वाहन थांबविण्यास सांगितले आणि याची माहिती पंप मालक विकास गवळी यांना दिली. त्यानंतर वाहन अडवून पोलिसांना कळविण्यात आले. माहिती मिळताच मालेगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंप मालक व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वाहनाची झडती घेतली असता कारमधून ५०० रुपयांच्या तब्बल ४ हजार ७०० बनावट नोटा आढळून आल्या.
जप्त करण्यात आलेल्या सर्व नोटांची एकूण किंमत २३ लाख ५० हजार रुपये असून त्या सर्व नोटांवर ‘भारतीय बच्चो का बैंक’ आणि ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ असे लिहिलेले होते. पोलिसांनी कारमधील सातही जणांना ताब्यात घेत वाहनासह मालेगाव पोलिस ठाण्यात आणले.
याप्रकरणी पंप कर्मचारी माधव केशव काटेकर (वय ६१, रा. मालेगाव) यांच्या फिर्यादीवरून मालेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७५/२०२६ नोंदविण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १७९ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल, पोलीस निरीक्षक राजेश खेरडे, पोलीस उपनिरीक्षक राजेश यलगुलवार व त्यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश यलगुलवार करीत आहेत.
पेट्रोल पंप कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचा वापर उघडकीस आला असून या प्रकरणाचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


