जालना : एका तक्रारदाराच्या शेत जमिनीच्या प्रकरणांत त्याच्या बाजूने निकाल लावण्यासाठी पाच लाखांची लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवार, 15 मे रोजी कारवाई केली होती.

जालना : एका तक्रारदाराच्या शेत जमिनीच्या प्रकरणांत त्याच्या बाजूने निकाल लावण्यासाठी पाच लाखांची लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवार, 15 मे रोजी कारवाई केली होती.
या कारवाईत महसूल सहायकाने स्वतः साठी आणि जालना तहसीलदार छाया पवार यांच्यासाठी 5 लाखांची लाच मागितल्याचे समोर आले होते. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तहसीलदार पवार यांचा जबाब नोंदवल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रशासकीय कार्यालयातील लाचखोरी वाढली आहे. यामध्ये महसूल आणि पोलीस प्रशासनाने बाजी मारली आहे. गुरूवारी जालना येथील तहसील कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी राजेंद्र श्रीपतराव शिंदे याला पाच लाखांची लाच मागितल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. दरम्यान, शिंदे याने ही लाच स्वतः साठी आणि तहसीलदार छाया पवार यांच्यासाठी मागितली होती. एसीबीच्या पथकाने शिंदे याला सापळा लावून जाळ्यात अडकवले होते. या प्रकरणांत तहसीलदार छाया पवार यांच्यावर संशयाची सुई असल्यामुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने छाया पवार यांचा जबाब नोंदवला आहे. एसीबीकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
लाच दोघांसाठी गुन्हा एकावरच कसा?
जालना येथील तहसील कार्यालयातील सहायक महसूल अधिकाऱ्याने स्वतः साठी आणि तहसीलदारांसाठी 5 लाखांची लाच मागितली. मात्र, या प्रकरणात फक्त सहायक महसूल अधिकाऱ्याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, तहसीलदारावर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे याबाबत नागरिकांत तर्कवितर्क सुरू आहे. दोन दिवसांपुर्वी छत्रपती संभाजीनगर येथे निवासी उपजिल्हाधिकारी आणि महसूल सहायक अशाच लाचेच्या जाळ्यात अडकले. तेथे दोघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली आहे. जालना येथे मात्र अशी कारवाई करण्यात आली नाही. यामुळे याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.