‘उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी नव्या संशोधनाचा लाभ घ्यावा’: कृषी संकल्प अभियानात केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांचे आवाहन 

बुलढाणा : शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञ यांच्यामधील संवाद अधिक बळकट व्हावा, यासाठी विकसित कृषी संकल्प अभियान  राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून विद्यापीठ आणि कृषी शास्त्रज्ञांनी निर्माण केलेले विविध संशोधन, तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचत आहे. शेती उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी नव्या संशोधनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. 

बुलढाणा : शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञ यांच्यामधील संवाद अधिक बळकट व्हावा, यासाठी विकसित कृषी संकल्प अभियान  राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून विद्यापीठ आणि कृषी शास्त्रज्ञांनी निर्माण केलेले विविध संशोधन, तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचत आहे. शेती उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी नव्या संशोधनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. 

    कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित कृषी संकल्प अभियानाच्यावतीने चिखली तालुक्यातील केळवद येथे सोमवार 9 जून रोजी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. अमोल झापे,  कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे,  आत्माचे प्रकल्प संचालक  पुरुषोत्तम उन्हाळे,    तहसीलदार संतोष काकडे, कृषि विज्ञान केंद्राच्या डॉ. भारती तिजारे (कृषिविद्या विभाग), डॉ. वाडकर (विस्तार शिक्षण), केळवद येथील प्रगतशील शेतकरी प्रतापराव पाटील उपस्थित होते.

कृषी विज्ञान केंद्रात दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामामध्ये पिकांचे प्रात्यक्षिक लावले जाते. या प्रात्यक्षिकामध्ये खरीप हंगामातील आणि रब्बी हंगामातील पिकांच्या विविध जातींची लागवड करून शेतकऱ्यांना माहिती मिळावी, असा त्याचा उद्देश असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या कृषी विज्ञान केंद्राला खरीप आणि रब्बी हंगामामध्ये भेट देऊन त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या वानांची माहिती आवर्जून घ्यावी असे आवाहनही ना. प्रतापराव जाधव यांनी केले. यावेळी मान्यवरांनी कृषि विज्ञान केंद्र, कृषी विभाग, बुलढाणाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी जैविक निविष्ठा, वाचन साहित्य आणि बीजप्रक्रिया प्रात्यक्षिकाचे आयोजन केलेल्या दालनाची पाहणी केली. प्रास्ताविकात कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. अमोल झापे यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेल्या तंत्रज्ञान केंद्राच्या संपर्कात राहून शेतकऱ्यांनी माहिती घ्यावी असे आवाहन केले. यावेळी भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून नॅशनल ब्युरो ऑफ  सॉईल सायन्स नागपूर या संस्थेच्या वतीने डॉ. निर्मल कुमार यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षण, बीज आणि खत व्यवस्थापन, ओलीत व्यवस्थापन आणि जमिनीच्या सुपीकतेचे व्यवस्थापन करण्याबाबत मार्गदर्शन केले. कृषी सखी वंदना टेकाळे यांनी विविध प्रक्रिया उद्योगाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार योगेश सरोदे यांनी केले.

शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ती नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन करून कृषि विज्ञान केंद्राला भेट देऊन नवीन तंत्रज्ञान अवगत करून घ्यावे, जेणेकरून शेती करणे फायद्याचे होईल, असेही त्यांनी सांगितले.

ड्रोनव्दारे फवारणीचे प्रात्याक्षिक

 यावेळी भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून नॅशनल ब्युरो ऑफ  सॉईल सायन्स नागपूर या संस्थेच्या वतीने उपस्थित शेतकऱ्यांना ड्रोनव्दारे फवारणीचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »