जालना : महावितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे जालना शहरातील वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. विजेच्या सततच्या लपंडावामुळे वैतागलेल्या जुना जालना भागांतील शेकडो नागरिकांनी शुक्रवार, 30 मे रोजी मस्तगड येथील महावितरणच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

जालना : महावितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे जालना शहरातील वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. विजेच्या सततच्या लपंडावामुळे वैतागलेल्या जुना जालना भागांतील शेकडो नागरिकांनी शुक्रवार, 30 मे रोजी मस्तगड येथील महावितरणच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

जुना जालना परिसरातील शंकरनगर येथील सामजिक कार्यकर्ते करण जाधव यांच्या नेतृत्वाखाली या भागातील संजयनगर, मिल्लत नगर, निळकंठ नगरातील शेकडो नागरिकांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजता महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर दोन ते तीन तास धरणे आंदोलन केले. यावेळी महिलांची मोठी संख्या होती.

शंकर नगरसह या परिसरातील वीज पुरवठा सातत्याने खंडित होत आहे. अघोषित भारनियमन असल्यासारखी वीज गायब होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रात्री अपरात्री, थोडासा पाऊस पडला, वादळ वारा सुटला की या भागातील वीज पुरवठा खंडित होतो. सध्या उकाड्याने नागरीकांना हैराण केलेले असताना वीज पुरवठा खंडित होत आहे. या भागातील विद्युत खांब वाकलेले आहे, वीज तारा लोंबकळल्या आहेत, डीपी उघड्या आहेत. देखभाल दुरूस्तीची कामे करण्यात आलेली नाही. यामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना याबाबत अनेकदा सांगूनही या भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला नसल्यामुळे सामजिक कार्यकर्ते करण जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी महावितरणच्या मनमानी कारभाराचा जोरदार घोषणाबाजी करून नागरीकांना निषेध व्यक्त केला. अखेर महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता व्यंकटेश पेंसलवार यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले. यावेळी आठ दिवसांत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन पेंसलवार यांनी दिले. त्यांनतर धरणे आंदोलन थांबविण्यात आले.
यावेळी करण जाधव, गजानन लुटे, कृष्णा सोनुने, धीरज चव्हाण, विनोद ठांगे, बंडू काळे, बाळासाहेब ढोरकुले, पूजा देशमाने, लता कोलते, नंदा पडोळ, कोमल शहाणे, राणी शहाणे, कोमल मोहिते, अर्चना तमखाणे, निर्मला महाजन, अरुणा हिवाळे, सचिन पौळ, आकांक्षा हिवाळे, वनिता लुटे, वंदना खरात, कमल गोडसे, मालती तिडके, प्रतिभा आटोळे, जयश्री नवघरे यांच्यासह नागरिक, महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
वीज पुरवठा सुरळीत करणार
शंकर नगरसह या भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल. वीज पुरवठा खंडित होण्याची कारणे तत्काळ शोधून काढली जातील. आठ दिवसांत वीज पुरवठा सुरळीतपणे करण्यात येईल.
– व्यंकटेश पेंसलवार, कार्यकारी अभियंता, जालना