जालना : शहरातील नागरी समस्यांकडे, सुविधांकडे सातत्याने डोळेझाक करणाऱ्या जालना महानगरपालिका प्रशासनाचे डोळे उघडल्याचा प्रयत्न शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवार, 7 जुलै रोजी मनपा कार्यालयासमोर ‘आखे तो खोलो स्वामी’ हे अनोखे आंदोलन करण्यात आले.

जालना : शहरातील नागरी समस्यांकडे, सुविधांकडे सातत्याने डोळेझाक करणाऱ्या जालना महानगरपालिका प्रशासनाचे डोळे उघडल्याचा प्रयत्न शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवार, 7 जुलै रोजी मनपा कार्यालयासमोर ‘आखे तो खोलो स्वामी’ हे अनोखे आंदोलन करण्यात आले.
जालना शहरातील नागरी समस्यांवर शिवसेनेच्या वतीने नेहमीच आंदोलने केली जातात. यापूर्वी देखील शहरातील नागरी प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलने करण्यात आली होती. मात्र, वारंवार आंदोलने करूनही महानगरपालिका आयुक्तांना गांभीर्य लक्षात न आल्याने सोमवारी पुन्हा एकदा हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आयुक्तांना शिवसेनेने केलेल्या आंदोलनांची तसेच नागरी समस्यांची चित्रफित दाखवण्यात आली. यावेळी उप जिल्हाप्रमुख बाबुराव पवार, शहर प्रमुख बाला परदेशी, दुर्गेश काठोटीवाले, विधानसभा संघटक दीपक रणनवरे, विजय पवार, गणेश घुगे, संदीप नाईकवाडे, युवासेना शहरप्रमुख दर्शन चौधरी, दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष रविकांत जगधने, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश राऊत यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या आंदोलनात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मनपाच्या कार्यालयासमोर प्रचंड घोषणाबाजी करून महापालिका परिसर दणाणून सोडला. जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी मोकाट कुत्रे, मुकाट जनावरे , रस्त्यावरील पोल, पाणीपुरवठा यासह जालना शहराचे वैभव असलेले मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह, छत्रपती संभाजी उद्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाची दुरावस्था, महात्मा फुले मार्केट, घनकचरा प्रकल्प, बंद पथदिवे, खराब रस्ते, स्वच्छता, उघडी गटारे या नागरी समस्या अत्यंत आक्रमकपणे मांडल्या. यावर तयार केलेली चित्रफीत दाखवून आता समस्यांचा निपटारा झालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. महापालिकेने आता या समस्या न सोडविल्यास शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी अंबेकर यांनी आयुक्तांना दिला. यावेळी उपशहर प्रमुख किशोर नरवडे, बबन काजळे, अनिल अंभोरे, गणेश लाहोटी यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
एक महिन्यात कारवाईचे आश्वासन
भास्कर अंबेकर यांनी मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना समस्यांची चित्रफित दाखवून आतातरी डोळे उघडा, अशी मागणी केली. त्यावर पुढील एक महिन्याच्या आत या सर्व प्रश्नांवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन आयुक्त खांडेकर यांनी दिल्याचे सांगण्यात आले.
