Chief Minister Shinde’s announcement : मराठवाड्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवार 23 मे रोजी घेतला. यावेळी पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठी घोषणा केली.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवार 23 मे रोजी घेतला. यावेळी पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठी घोषणा केली. थकीत बिलामुळे पाणीपुरवठा खंडीत होणार नसल्याचे ते म्हणाले. तर भूजल पातळी वाढविण्यासाठी विविध सामाजिक संस्थांची मदत घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठवाडा दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय कार्यालयात मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली. ही बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांची उपस्थिती होती.
ते म्हणाले की, मराठवाड्यात 1837 टँकर सुरु आहेत. 1250 गावांमध्ये हे टँकर जात आहेत. टँकर्सची आवश्यकता भासली तर ग्रामसेवकांपर्यंत, तलाठ्यांपर्यंत सूचना दिलेल्या आहेत. त्यांना काय गरजेचे आहे, याची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार पुरवठा केला जाणार आहे. शिवाय टँकर आणि चाऱ्याची देखील व्यवस्था केली जाणार आहे.
चाऱ्याची कमतरता भासू देणार नाही
पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणीपुरवठा आणि चारा प्रश्नावर भाष्य केले. ते म्हणाले की, पाणी स्वच्छ असले पाहिजे, पाण्याची गुणवत्ता चांगली असली पाहिजे. आपण पूर्वी डिपीडीसीमधून चारा उगवण्यासाठी पैसे दिले होते. त्यामुळे जिल्ह्यामध्ये सध्या पूरेल एवढा चारा आहे. चाऱ्याची कमतरता भासू नये, यासाठी सूचना देखील दिलेल्या आहेत. पाण्याच्या जुन्या बिलाचे नंतर पाहू. थकीत बिलामुळे पाणीपुरवठा योजना बंद पडणार नाही. भूजल पातळीत घट आली आहे. त्यासाठी संस्थांना सूचना दिल्या असल्याचीही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करणार
पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठवाड्याची भूजल पातळी खालावली आहे. त्यासाठी ही पातळी वाढविण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत. नाम फाऊंडेशन आहे, आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण यासह अभिनेत आमिर खानचे पानी फाऊंडेशन या सर्व एनजीओंची मदत घेऊन गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार करण्याचे प्रयत्न करणार आहोत. पाणी जिरवण्याची क्षमता वाढली तर पाणीसाठा वाढेल. पाण्याचे नियोजन व्यवस्थित व्हावे, यासाठी सूचना दिल्या असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
बोगस बियाणे आणि खत आढळले तर जेलमध्ये
बोगस बियाणे आणि खत आढळले तर जेलमध्ये टाकले जाणार आहे. मुख्य सप्लायरचा सर्व्हे करून तपासणी करणार आणि बोगस बियाणांची अडचण येणार नाही, याची काळजी घेऊ. बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सूचना दिल्या आहेत. अवकाळीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
ऐनवेळी आला बैठकीचा निरोप
मराठवाड्याच्या आढावा बैठकीचा मला सकाळी सहा वाजता निरोप आला. मी रस्ता मार्गे मुंबईवरुन छत्रपती संभाजीनगर गाठले. मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई आहे. साडेअकराशे टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सरकारने आता निवडणूक संपली आहे. आता सरकारने आता या समस्येकडे लक्ष दिले पाहीजे. तर पालकमंत्री गैरहजरीबाबत मी त्यांना दोष देत नाही, त्यांनाही माझ्यासारखेच ऐनवेळी सांगितले.
-अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद.
दुष्काळी मराठवाड्याचा आढावा घेता खान्देशच्या मंत्र्यांनी
दुष्काळ सदृश्य परिस्थीती मराठवाड्यातील असताना मराठवाड्यातील नेते परदेशात गेल्याचे वास्तव आहे. तर या दुष्काळी परिस्थीतीच्या आढाव्यासाठी उत्तर महाराष्ट्रामधील मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती होती. तेव्हा मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा खान्देशच्या मंत्र्यांनी घेतला असे म्हणणे वावगे ठरणार नाही.