Action taken against two gangsters: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील दोघांवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
भोकरदन (जि. जालना) : जालना पोलिसांनी मागील सहा महिन्यापासून जिल्ह्यात वाढणारी संघटीत गुन्हेगारी, अवैध शस्त्र बाळगूण खंडणी मागणे, अवैध वाळू तस्करी आणि वाहतूक करतांना शासकीय लोकसेवकास मारहाण अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर प्रभावी कारवाई केली आहे. अशातच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील दोघांवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
हसनाबाद पोलीस ठाणे हद्दीतील गणेश संतुकराव पुंगळे (32, वर्षे रा.राजूर ता. भोकरदन), किरण केलास पंडीत (२७, रा.मेरखेडा ता. भोकरदन) हे दोघे सार्वजनिक ठिकाणी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करुन त्या दहशीतीच्या जोरावर ते पिस्टल वापरुन लोकांना खंडणी स्वरुपात पैशांची मागणी करत होते. तसेच व्यापाऱ्यांचा पाठलाग करुन त्यांच्याकडील बळाचा वापर करुन चोरुन घेऊन जाणे, अवैध वाळूची तस्करी आणि वाहतूक करतांना शासकीय लोकसेवकास मारहाण करणे अशा प्रकारचे गुन्हे करुन मानवी आरोग्यास घातक व धोकादायक ठरणारी वृत्ती करत होते. त्यामुळे जालना जिल्ह्यात आणि हसनाबाद पोलीस ठाणे तसेच आजुबाजुच्या परिसरामध्ये या दोघांची दहशत निर्माण झालेली असल्याने नजिकच्या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. गणपत दराडे, स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खन्नाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल हजारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय आहिरे, पोलीस उपनिरिक्षक फकरीचंद फडे, समद शेख, पोलीस कॉन्स्टेबल खराट, चरावंडे, बोर्ड, पोलीस कॉन्स्टेबल दीपक सोनुने यांनी केली आहे.
आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल
स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध खंडणी मागण्यासह आर्म ॲक्ट अन्वये एकुण ४ गुन्हे, जबरी चोरी सदराखाली १ गुन्हा, अवैध वाळू वाहतूक करतांना शासकीय लोकसेवकास दमदाटी सदराखाली ५ गुन्हे दाखल असून, त्यांचेवर प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाईसुद्धा करण्यात आली होती. परंतु याबाबीचा त्यांचेवर काहीएक परिणाम न होता त्यांचे गुन्हेगारी व धोकादायक कारवाई चढत्या क्रमाने सुरूच ठेवलेल्या होत्या. त्याअनुषंगाने महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स), वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ कायद्यान्वये त्यांचे गुन्हेगारी व धोकादायक कृत्यांना प्रतिबंध करणे आवश्यक होते.
कारवाईमध्ये सातत्य
जालना पोलिसांनी त्यांच्या कारवाईमध्ये सातत्य ठेवून सुरू २०२४ या वर्षामध्ये एकुण सहा एमपीडीए प्रस्ताव सादर करुन त्यापैकी एकुण पाच गुन्हेगारांना स्थानबध्द करण्यात आले आहे. सोबतच जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेचे अभिलेखावरील अशा प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगारांची गुन्हेनिहाय यादी तयार करण्यात आली असून, त्या गुन्हेगारांविरुद्ध पुढील काळात अशाच प्रकारचे प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहेत.