dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

नगरसेवकांच्या पात्रतेची चौकशी करा; आ. दानवे यांचे नगरविकास विभागाला पत्र

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील काही विद्यमान नगरसेवकांच्या पात्रतेबाबत गंभीर आक्षेप उपस्थित करत महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी नगरविकास विभागाला सखोल चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र पाठविले आहे. संबंधित नगरसेवकांविरुद्ध नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास कायद्यानुसार आवश्यक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव, यांना पाठविलेल्या पत्रात काही नगरसेवकांबाबत चार गंभीर बाबी निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये तीन अपत्यासंदर्भातील लागू असलेल्या तरतुदींचे कथित उल्लंघन, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम, गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल असणे तसेच आरक्षित प्रवर्गातून निवडून आलेल्या काही नगरसेवकांनी विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याचा समावेश आहे.

पत्रात नमूद करण्यात आले आहे की, या सर्व बाबी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम तसेच इतर लागू कायदे, नियम आणि शासन निर्णयांच्या अनुषंगाने संबंधित नगरसेवकांच्या पात्रतेवर परिणाम करणाऱ्या ठरू शकतात. त्यामुळे प्रत्येक प्रकरणाची वस्तुस्थिती पडताळून दोषी आढळणाऱ्या नगरसेवकांविरुद्ध कायदेशीर तरतुदीनुसार आवश्यक कारवाई करण्यात यावी.

तसेच, प्रत्येक प्रकरणाबाबत संबंधित नगरसेवकाचे नाव व प्रभाग क्रमांक, प्रकरणाचे स्वरूप व उपलब्ध अभिलेख, चौकशीची सद्यस्थिती, आतापर्यंत करण्यात आलेली कारवाई, पुढील प्रस्तावित कारवाईचा कालबद्ध कार्यक्रम तसेच कारवाई प्रलंबित असल्यास त्यामागील कारणे स्वतंत्रपणे सादर करण्याचे निर्देशही नगरविकास विभागाला देण्यात आले आहेत. या पत्रामुळे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील संबंधित नगरसेवकांच्या पात्रतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, नगरविकास विभागाच्या चौकशी अहवालाकडे राजकीय वर्तुळासह नागरिकांचेही लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top