शिरपूर (जैन) : बस्ती मंदिरातील वेदी क्रमांक २ मधील भगवान मुनिसुव्रतनाथ स्वामींच्या मूर्तीच्या विटंबनेच्या निषेधार्थ तसेच संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दिगंबर जैन समाजाच्या वतीने रविवारी (२० सप्टेंबर) शिरपूर (जैन) येथे मूक मोर्चा काढण्यात आला. सुमारे ३०० दिगंबर जैन भाविक सहभागी झालेल्या या मोर्चाद्वारे पोलिस प्रशासनाचे लक्ष घटनेकडे वेधण्यात आले.

शिरपूर (जैन) : बस्ती मंदिरातील वेदी क्रमांक २ मधील भगवान मुनिसुव्रतनाथ स्वामींच्या मूर्तीच्या विटंबनेच्या निषेधार्थ तसेच संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दिगंबर जैन समाजाच्या वतीने रविवारी (२० सप्टेंबर) शिरपूर (जैन) येथे मूक मोर्चा काढण्यात आला. सुमारे ३०० दिगंबर जैन भाविक सहभागी झालेल्या या मोर्चाद्वारे पोलिस प्रशासनाचे लक्ष घटनेकडे वेधण्यात आले.
निवेदनानुसार, १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते ८ वाजेच्या दरम्यान बस्ती मंदिरातील वेदी क्रमांक २ मधील भगवान मुनिसुव्रतनाथ स्वामींच्या संगमरवरी मूर्तीचा डावा कान तुटल्याची घटना घडली. या घटनेमुळे जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी श्री अंतरीक्ष पार्श्वनाथ महाराज संस्थानच्या वतीने त्याच दिवशी शिरपूर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. घटनेनंतरही ठोस कायदेशीर कारवाई झालेली नसल्याचा आरोप करीत समाजाच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. घटनेची सखोल चौकशी करून मूर्तीची विटंबना करणाऱ्या संबंधितांवर भारतीय न्याय संहितेतील (BNS) योग्य कलमांन्वये गुन्हा दाखल करावा, संबंधितांना तातडीने अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच घटनास्थळाचा आणि खंडित मूर्तीचा तज्ज्ञांच्या उपस्थितीत पंचनामा करावा, घटनेशी संबंधित सर्व पुरावे सुरक्षित ठेवावेत आणि मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याबाबतच्या संशयाची चौकशी करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक पुरावे तपासून घटनेमागील नेमके कारण व संबंधितांची भूमिका स्पष्ट करावी, अशी भूमिका समाजाच्या वतीने मांडण्यात आली. सध्या दिगंबर जैन समाजाचे पर्युषण पर्व सुरू असल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. खंडित मूर्तीच्या ठिकाणी धार्मिक विधी आणि नित्यपूजेचा प्रश्न निर्माण होत असल्याने पर्यायी नवीन मूर्ती ठेवून पूजा करण्यास आवश्यक परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. याशिवाय मंदिरातील सर्व वेदी व मूर्तींच्या सुरक्षेसाठी दिगंबर जैन संस्थानला स्वतंत्र सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यास परवानगी द्यावी आणि आवश्यक पोलिस संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. मोर्चादरम्यान समाजाच्या प्रतिनिधींनी प्रशासनाकडे निवेदन सादर करून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. दरम्यान, मागण्यांवर तातडीने ठोस कार्यवाही न झाल्यास आंदोलन अधिक व्यापक करण्याचा इशारा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. तहसील कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निवेदने देणे, धरणे व मोर्चे काढणे तसेच वरिष्ठ प्रशासनाकडे दाद मागण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन या प्रकरणात पुढील कोणती कारवाई करते, याकडे जैन समाजाचे लक्ष लागले आहे.


