मॉस्को : यूक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला आहे. यूक्रेनने हजारो ड्रोन रशियाच्या दिशेने सोडले. आतापर्यंतच्या माहितीनुसार रशियाकडून यूक्रेनचे 1900 ड्रोन रोखण्यात आले आहेत. यूक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात दोन रशियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रशियातील संसदीय निवडणुकींच्या अखेरच्या दिवशी मॉस्कोत ड्रोन हल्ले करण्यात आले. एका मोठ्या रिफायनरीचे नुकसान देखील झाले आहे. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी ड्रोन हल्ल्यांसदर्भात माहिती दिली.

1900 ड्रोन रोखल्याचा रशियाचा दावा : दोन जणांचा मृत्यू
मॉस्को : यूक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला आहे. यूक्रेनने हजारो ड्रोन रशियाच्या दिशेने सोडले. आतापर्यंतच्या माहितीनुसार रशियाकडून यूक्रेनचे 1900 ड्रोन रोखण्यात आले आहेत. यूक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात दोन रशियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रशियातील संसदीय निवडणुकींच्या अखेरच्या दिवशी मॉस्कोत ड्रोन हल्ले करण्यात आले. एका मोठ्या रिफायनरीचे नुकसान देखील झाले आहे. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी ड्रोन हल्ल्यांसदर्भात माहिती दिली.
यूक्रेनच्या अधिकाऱ्यांनी रात्रभर रशियाकडून कीव्हवर हल्ले करण्यात आल्याचे सांगितले आहे. रशियाच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला, त्यात तीन लहान मुलांचा समावेश होता. रशिया आणि यूक्रेनकडून एकमेकांवरील हल्ले तीव्र केले जात आहेत. मॉस्कोचे गव्हर्नर आंद्रे वोरोब्योव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की ड्रोन हल्ला हा मोठा हल्ला होता. यूक्रेनच्या हल्ल्यात एका 44 वर्षीय महिलेचा आणि एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्य झाला आहे. वोरोब्योव यांनी म्हटले की एका 21 मजली इमारतीला ड्रोनच्या हल्ल्यामुळे आग लागली, तिथून 400 लोकांना बाहेर काढण्यात आले. मॉस्को ऑइल रिफायनरीच्या एका भागात नुकसान झाले असून आपत्कालीन सेवा कार्यरत असल्याचे त्यांनी म्हटले. यूक्रेनने यापूर्वी देखील या रिफायनरीवर हल्ले केले आहेत. ड्रोन हल्ल्याद्वारे यूक्रेनचा रशियाच्या निवडणुकीत हस्तक्षेपाचा प्रयत्न असल्याचा आरोप देखील वोरोब्योव यांनी केला. मात्र, त्यांना यात यश आले नाही, असेही ते म्हणाले.
तेल ठिकाणांच्या महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला
यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी ड्रोन हल्ल्याचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की काल रात्री मॉस्कोमध्ये आमच्या हल्ल्याचा चांगला परिणाम दिसून आला. रशियन तेल ठिकाणांच्या महत्त्वाच्या ठिकाणी आणि लॉजिस्टिक सेंटरवर हल्ला करण्यात आला. दरम्यान, रशियाच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रमुखांनी म्हटले यूक्रेनच्या खेरसॉनवर रशियाचा कब्जा असून तिथ एका प्रवासी बसवर ड्रोन हल्ला झाला, ज्यात दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक निवडणूक अधिकारी देखील होता.
रशियात युक्रेन युद्धानंतर पहिली संसदीय निवडणूक
रशियात शुक्रवारपासून संसदीय निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवर रशियाने केलेल्या पूर्ण पल्ल्याच्या हल्ल्यानंतरची ही पहिली संसदीय निवडणूक आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ही निवडणूक युक्रेनमध्ये लढणाऱ्या रशियन सैनिकांसाठी जनतेच्या समर्थनाची परीक्षा म्हणून सादर केली आहे. रशिया निवडणुकीच्या निकालांना पुतिन यांच्या धोरणांना आणि युक्रेनमधील युद्धाला मिळालेल्या समर्थनाच्या रूपात सादर करू शकतो.