छत्रपती संभाजीनगर : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये रविवारी हायकोर्ट लिपिक पदासाठी ऑनलाइन परीक्षा पार पडत असताना छत्रपती संभाजीनगर शहरातील सेव्हन हिल परिसरातील सुराणा नगर येथील परीक्षा केंद्रावर या परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. परीक्षा सुरू होताच अचानक सर्व्हर डाऊन झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला असून, यामुळे शेकडो परीक्षार्थीची परीक्षा खोळंबली.

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये रविवारी हायकोर्ट लिपिक पदासाठी ऑनलाइन परीक्षा पार पडत असताना छत्रपती संभाजीनगर शहरातील सेव्हन हिल परिसरातील सुराणा नगर येथील परीक्षा केंद्रावर या परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. परीक्षा सुरू होताच अचानक सर्व्हर डाऊन झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला असून, यामुळे शेकडो परीक्षार्थीची परीक्षा खोळंबली. विशेषतः दूरवरून आलेल्या उमेदवारांना या अचानक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीचा फटका बसला. दरम्यान, विद्यार्थी आक्रमक झाले असून, कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके देखील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही, अशी भूमिका दिपके यांनी घेतली आहे.
अभिजीत दिपके म्हणाले, रविवारी उच्च न्यायालयाच्या लिपिक पदासाठी परीक्षा होती. इथे खूप लांबून विद्यार्थी आले होते. ते जेव्हा परीक्षेला बसले तेव्हा त्यांना समजले की इथले संगणक काम करत नाही, तर कोणाची स्क्रीन काम करत नाही. विशेष म्हणजे 10 मिनिटांच्या आत लॉग आऊट होत होते. याचा अर्थ सर्व्हरही चांगले काम करत नव्हते. आणि सगळ्याच विद्यार्थ्यांना फेल करण्यात आले आहे. तर हे विद्यार्थी फेल नाही झाले, ही सिस्टम फेल झाली आहे, सरकार फेल झाले असल्याचे त्यांनी सांगितले. या सेंटरवरचे जे आहेत तेच विद्यार्थ्यांना सांगत होते की तुम्हाला कळत नाही का परीक्षा कशी द्यायची. हे विद्यार्थी इतके लांबून आले आहेत. मुलांची अशी मागणी आहे की पुन्हा परीक्षा झाली पाहिजे आणि लगेच झाली पाहिजे. जोपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयाचे जज बाहेर येऊन लिखितमध्ये गॅरंटी देत नाही तोपर्यंत इथून कोणीच हलणार नाही, असा पावित्रा अभिजीत दिपके यांनी घेतला आहे.
कीबोर्ड जाम, वेबसाईट स्लो
नांदेड : मुंबई उच्च न्यायालयाच्या टायपिंग परीक्षेदरम्यान नांदेडमध्येही मोठा गोंधळ झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. परीक्षा देताना अनेक उमेदवारांना सदोष आणि जाम झालेले कीबोर्ड देण्यात आल्याने टायपिंग करताना अडचणी निर्माण झाल्या. त्यातच परीक्षेची वेबसाईट स्लो असल्याने वेळेत पेपर पूर्ण करता आला नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. काही परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचा दावा परीक्षार्थींनी केला आहे. विशेष म्हणजे, काही केंद्रांवर केवळ एकच विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.