‘Women’s Rule’ in Jalna Collectorate: दोन वर्षांपूर्वी जुलै महिन्यात जिल्हाधिकारी म्हणून पहिलीच नियुक्ती मिळालेले डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची बुधवार, 30 जुलै रोजी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विनोद काळे / जालना : दोन वर्षांपूर्वी जुलै महिन्यात जिल्हाधिकारी म्हणून पहिलीच नियुक्ती मिळालेले डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची बुधवार, 30 जुलै रोजी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी म्हणून मित्तल या देखील प्रथमच जबाबदारी घेणार आहेत. दरम्यान, मित्तल यांच्या नियुक्तीमुळे जालना जिल्हाधिकारी कार्यालयात महिला अधिकाऱ्यांचे ‘राज’ आले आहे.
डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून दोन वर्षांपूर्वी जालना जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली. जिल्हाधिकारी म्हणून पहिल्यांदाच जबाबदारी मिळाल्याने आणि मुळातच मितभाषी स्वभावाच्या डॉ. पांचाळ यांनी सावधपणे भूमिका घेऊन कारभार केला. त्यांच्या कार्यकाळातील दोन वर्षात त्यांनी मराठा – ओबीसी आरक्षणाच्या मागणीमुळे जिल्ह्यातील चिघळलेल्या सामाजिक संघर्षाला व्यवस्थितपणे हाताळले. मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने निर्माण झालेला जातीय तणाव निवळण्यात डॉ. पांचाळ यांनी योग्य पद्धतीने नियोजन केले. मात्र, जिल्हा प्रशासनातील दप्तर दिरंगाई, कार्यालयीन शिस्त, प्रलंबित कामांचा निपटारा आणि प्रशासनाचे उत्तरदायित्व याबाबत अधिकारी – कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यात डॉ. पांचाळ यांना फारसे काही यश आले नाही. असे असले तरी त्यांनी नैसर्गिक आपत्तीच्या अनुदान वाटपात करण्यात आलेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्याला उघडकीस आणून त्यानुसार दोषी अधिकारी – कर्मचाऱ्यांवर निलंबनाची तसेच विभागीय चौकशी, शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली.
जालना – नांदेड समृध्दी महामार्गाच्या भूसंपादनाच्या योग्य मोबदल्यासाठी दोन महिन्यांपेक्षा अधिक दिवसापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हाताळण्यात डॉ. पांचाळ यांनी प्रयत्न केले. मात्र, हे आंदोलन थांबविण्यात त्यांना यश आले नाही.
एकूणच जिल्हाधिकारी म्हणून डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्वच्छ प्रतिमेचा, मृदू भाषाशैलीत संवाद साधणारा रुबाबदार अधिकारी म्हणून छाप पाडली. दरम्यान, ते तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील अशी अपेक्षा असतानाच बुधवारी सामान्य प्रशासन विभागाचे अवर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी डॉ. पांचाळ यांच्या जागी आशिमा मित्तल यांच्या नियुक्तीचे आदेश काढले. डॉ. पांचाळ यांची पदस्थापना कुठे करण्यात आली याबाबत मात्र आदेशात उल्लेख नाही.
कोण आहेत आशिमा मित्तल ?
मूळच्या राजस्थानमधील जयपूर येथील असलेल्या आशिमा मित्तल या 2018 मधील बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्या नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. जिल्हाधिकारी म्हणून त्यांची देखील जालना येथे पहिलीच नियुक्ती आहे. त्या मानववंशशास्त्रात पदव्युत्तर पदवीधारक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात ‘महिलाराज’
जिल्हाधिकारी म्हणून आशिमा मित्तल गुरूवार, 31 जुलै रोजी पदभार स्वीकारणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार, उपजिल्हाधकारी म्हणून मनीषा दांडगे, सरिता सुत्रावे, सविता चौधर या महिला अधिकारी कार्यरत आहेत. तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नुकत्याच मिन्नू पी. एम. या महिला आयएएस अधिकारी रुजू झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनात आता ‘महिलाराज’ आल्याचे दिसत आहे.
