जालना : मित्रांसोबत खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवार, 13 सप्टेंबर रोजी दुपारी घडली. जालना शहराच्या जवळच असलेल्या वडारवाडी शिवारात ही घटना घडली. सिद्धांत हरबडे ( 15 ), जस्मितसिंग रेहाल ( 17 ) अशी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.

जालना शहरातील समर्थनगर येथे राहणारा सिद्धांत हरबडे आणि छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेला जस्मितसिंग रेहाल आणि अन्य दोन मित्र शनिवारी दुपारी वडारवाडी शिवारातील खदानीत पोहण्यासाठी गेले होते. मात्र, यातील दोघांना पोहता येत नसल्यामुळे सिद्धांत आणि जास्मितसिंग हे दोघेही पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात बुडाले. दरम्यान, इतर मित्रांनी पाण्यातून बाहेर येऊन आरडाओरडा करून गावातील नागरिकांना घटनास्थळी बोलावले. स्थानिक नागरिकांनी धाव घेईपर्यंत या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच तालुका जालना पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. नागरिकांच्या मदतीने दोघांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिस कर्मचारी मदन गायकवाड, सचिन आर्य, डी. सी. मेहेत्रे यांनी घटनेचा पंचनामा करून दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले. दरम्यान, घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
सिद्धांत होता एकुलता एक
इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेणारा सिद्धांत हरबडे हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय हरबडे यांचा एकुलता एक मुलगा होता, अशी माहिती घटनास्थळी उपस्थित नातेवाईकांनी दिली. तर जस्मितसिंग रेहाल वडील एका कंपनीत नोकरीला असल्याचे सांगण्यात आले.