बुलढाणा : मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. मग बचत गटातील छोट्या बचतीपासून राजकारण, समाजकारण ,साहित्य, शैक्षणिक क्षेत्र ,खेळ ,कला ,नाट्य आदर्श गृहिणी ते वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांद्वारे नावलौकिक वाढवणाऱ्या युवतींपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात महिला चमकदार कामगिरी करत आहेत. आज आपल्या दैनिक महाभुमी गौरव या सदरामध्ये सर्वात प्रतिष्ठेची व कठीण समजल्या यूपीएससी परीक्षेत बाजी मारलेल्या बुलढाण्याच्या लेकीची गौरव गाथा आज आपण वाचणार आहोत.

बुलढाणा : मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. मग बचत गटातील छोट्या बचतीपासून राजकारण, समाजकारण ,साहित्य, शैक्षणिक क्षेत्र ,खेळ ,कला ,नाट्य आदर्श गृहिणी ते वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांद्वारे नावलौकिक वाढवणाऱ्या युवतींपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात महिला चमकदार कामगिरी करत आहेत. आज आपल्या दैनिक महाभुमी गौरव या सदरामध्ये सर्वात प्रतिष्ठेची व कठीण समजल्या यूपीएससी परीक्षेत बाजी मारलेल्या बुलढाण्याच्या लेकीची गौरव गाथा आज आपण वाचणार आहोत.
एकत्रित कुटुंबात वाढलेल्या श्रुतीला लहानपणापासूनच कुटुंबात अतिशय पोषक असा वातावरणात समय सूचकता तसेच मेहनतीचे धडे मिळाले. सुरुवातीला इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेऊन अकरावी बारावी भारत शाळेत विज्ञान शाखेत केलेली मुलगी काही वर्षांपूर्वी करिअर कशात करावे या संभ्रमात होती.नंतर कला शाखेत पदवी घेतली खरंतर या आणि अशाच वळणावर आपल्याला योग्य मार्गदर्शन सल्ला आणि गुरूंची गरज असते. ज्या यूपीएससी परीक्षेत आज बुलढाण्याचे नावलौकिक श्रुतीने वाढवले तशी परीक्षा असते किंवा तीच करायची असे तिच्या ध्यानीमनी देखील नसताना भारत शाळेचे प्राध्यापक प्रेषित सिद्धभट्टी यांनी श्रुतीला या स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती दिली आणि प्रोत्साहन सुद्धा दिले. बारावीनंतर लगेचच पदवी आणि पुढील अभ्यासासाठी श्रुती दिल्ली येथे रवाना झाली. जैन समाजातर्फे दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शन केंद्र सोडल्यास श्रुतीने फक्त स्वाध्याय अर्थात सेल्फ स्टडी वर जास्त भर दिला. त्यासोबतच सोशल मीडियावर उपलब्ध असणाऱ्या विविध पर्यायांचा देखील तिने उपयोग करून घेतला जेणेकरून असंख्य पर्यायांमधून तिला योग्य निवडण्याची दिशा गवसली. श्रुतीचे वडील बुलढाण्यातील नामांकित व्यावसायिक असून एक बहीण लेखिका कवयित्री व दुसरी बहीण मुंबई येथे चार्टर्ड अकाउंटंट आहे. तिच्या या यशाचे श्रेय आई वडील तसेच संपूर्ण कुटुंबाचा पाठिंबा, स्वतःची जिद्द ,मेहनत आणि योग्य मार्गदर्शन केलेल्या प्रेषित सिद्धभट्टी सरांना ती देते.
खरंतर यूपीएससी सारखी परीक्षा वेळ खाऊ असते. घवघवीत यशाची अपेक्षा आपल्याला असल्यास त्यासाठी शांतता संयम प्रचंड मेहनतीची गरज असल्याचे श्रुती सांगते. माझ्या पिढीला किंवा आजकालच्या पालकांना सगळ्यांनाच लवकरात लवकर यश मिळवण्याची घाई झाली आहे एकदा का नीट जेईई ला सिलेक्ट झालं म्हणजे आपण जिंकलो असं होत नाही. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे आणि या स्पर्धेत टिकून राहायचे असल्यास योग्य दिशा मार्गदर्शन व अभ्यासाची नितांत गरज असल्याचे श्रुती सांगते. यूपीएससी करायचे ठरवल्यास केवळ एकाच गोष्टीवर निर्भर राहून जमत नाही तर त्यासाठी आपण जे ठरवले त्यावर ठाम राहून त्या दृष्टीने सतत प्रयत्न करत असताना इतर पर्यायांचा देखील विचार केला पाहिजे. जो मिळेल तो हाताशी आलेला एखादा पर्याय स्वीकारून निश्चित ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अभ्यासातील सातत्य आवश्यक आहे. मुळात ही परीक्षा द्यायची ठरल्यास व यश मिळवायचे ठरल्यास प्रत्येक विद्यार्थ्याने पाच ते सहा वर्षे आपल्याला लागतील हे निश्चित करावे .बऱ्याचदा आपल्याकडून होईल किंवा नाही असे निराशा जनक विचार येत असतात अशावेळी आई वडील व कुटुंबीयांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा ठरतो कारण प्रचंड मोठ्या प्रमाणावर असणारा यूपीएससीचा अभ्यासक्रम संपूर्ण माहिती प्रत्येक विद्यार्थ्याच्या आवाक्या बाहेर असते टप्प्याटप्प्याने आपण या पायऱ्या पूर्ण करत गेल्यास मनात कुठलीच घालमेल राहत नाही. अशावेळी स्वतःवर प्रचंड विश्वास आणि वेळ मिळाल्यास इतरांचा सल्ला घेण्यास कमीपणा वाटू देऊ नये. एखाद्याचा अभ्यास योग्य दिशेने असल्यास नशिबाची साथ आणि आपल्या प्रयत्नांना पहिल्याच वेळी यश मिळते मात्र असे खूप कमी लोकांसोबत होते आणि त्या कमी लोकांमध्ये आपण नसलो तरी स्वतःचा आत्मविश्वास कमी होऊन देता दुसरा पर्याय आपल्याजवळ तयार ठेवावा असा सल्ला देखील ती युवक युवतींना देते. स्वतः तिला इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्विस मध्ये निवडीसाठी दोन वेळा प्रयत्न करावे लागले. यूपीएससीच्या विविध टप्प्यांमधील मुख्य परीक्षा मुलाखत यात मागेपुढे झाल्यास पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करणे हे कोणत्याही विद्यार्थ्यांसाठी शून्यातून सुरुवात करण्यासारखेच असते. श्रुती एवढ्यावरच न थांबता सध्या एक वर्षाची सुट्टी घेऊन प्रशिक्षणाला न जाता पुढील परीक्षेची तयारी करणार असून अपेक्षित यश मिळाल्यास हा पर्याय सोडून देईल पण एक शेवटचा प्रयत्न करून पाहण्याच्या तिच्या जिद्दीला मानावेच लागेल. असंख्य तरुण मुला मुलींसाठी तिचे आजचे यश प्रेरणादायी असून प्रचंड मेहनत घेतलेल्या श्रुतीला शांत संयमी विनयशील बोलताना बघून काही विद्यार्थी खरंच यूपीएससी साठीच असतात याचा प्रत्यय येतो.
आताच्या पिढीच्या हाताशी असलेल्या युट्युब तसेच इतर सोशल मीडिया माध्यमांबद्दल देखील श्रुती आवर्जून सांगते. आपल्याला कुठलीही अडचण आल्यास यूपीएससीतील अनेक टॉपर मुला मुलींचे व्हिडिओ व मार्गदर्शन आपण सहज बघू शकतो. यासाठी गरजेचे नाही की आपण खूप मोठ्या क्लासेसद्वारेच यश मिळवू शकू. अनेकांच्या पैशाच्या अडचणी असतात किंवा घर सोडून जाऊ शकत नाही अशांसाठी सोशल मीडियावर अनेक पर्याय उपलब्ध असल्याचे ती सांगते . फक्त यासाठी योग्य दिशा निवडून अभ्यास व स्वतःवरील विश्वास कमी होऊ द्यायचा नाही हा एकच मंत्र ध्यानात ठेवावा. आपल्याला सहा वेळा परीक्षा देण्याची संधी असते अशावेळी केवळ परीक्षा द्यायची आहे म्हणून द्यायची नाही तर पहिल्यांदा परीक्षा देताना सुद्धा शंभर टक्के तयारीनिशी देण्याचा प्रयत्न करावा अन्यथा केव्हा आपण शेवटच्या अटेम्प्टला येऊन ठेपतो हे माहीत देखील पडत नाही. त्यामुळे आपल्याला मिळणाऱ्या सहा संधी उगाच वाया न घालवता दर परीक्षेला नव्या उमेद व आत्मविश्वासासह विद्यार्थ्यांनी पाऊल टाकावे. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी की योग्य वेळी आपल्याला यातून बाहेर देखील पडता आले पाहिजे. शेवटच्या प्रयत्नानंतर यश न मिळाल्यास आपल्याजवळ दुसरा पर्याय असला पाहिजे जेणेकरून आपल्याला स्वतःचा आणि कुटुंबीयांचा आर्थिक प्रश्न सोडवता येईल.