वाळू माफियांना दणका ; आठ बोटी नेस्तनाबूत  

अंढेरा :  देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा जलाशयातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या आठ  बोटी महसूल प्रशासनाने उद्ध्वस्त केल्या असून, राज्यस्तरीय शोध व बचाव पथकाच्या सहाय्याने २४ मार्च रोजी दिवसभर ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे, वाळू माफियांना दणका मिळाला आहे. 

अंढेरा :  देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा जलाशयातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या आठ  बोटी महसूल प्रशासनाने उद्ध्वस्त केल्या असून, राज्यस्तरीय शोध व बचाव पथकाच्या सहाय्याने २४ मार्च रोजी दिवसभर ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे, वाळू माफियांना दणका मिळाला आहे. 

खडकपूर्णा जलाशयातून अवैध वाळू उपसाच्या घटना वाढल्याने काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र, मध्यंतरी वाळू तस्करांवर दुर्लक्ष झाल्याने पुन्हा वाळू तस्करीच्या अनेक घटना समोर आल्या. सर्रासपणे खडकपूर्णा नदीच्या जलपात्रातून रात्रीबेरात्री अवैध वाळू तस्करीच्या घटना समोर आल्या होत्या. दिवसेंदिवस वाळू माफियांची वाढती मुजोरी लक्षात घेता देऊळगांव राजा तालुका महसूल प्रशासनाने धडक कारवाईची मोहीम हाती घेतली. त्यानुसार, खडकपूर्णा  प्रकल्पात अवैधरित्या वाळू  उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेण्यासाठी महसूल विभागाने राज्यस्तरीय शोध व बचाव पथकाला पाचारण केले होते. त्यानुसार, सोमवारी या पथकाच्या सहाय्याने जलाशयातील आठ बोटी स्फोटकांनी नेस्तनाबूत करण्यात आल्या. यापूर्वी देखील खडकपूर्णा धरणाच्या तळातून रेती उपसणाऱ्या २८  बोटी नष्ट करण्यात आल्या होत्या. रेती तस्करांनी पुन्हा डोके वर काढले आणि परिसरात बोटी लावण्यात आल्या. यासंदर्भात देऊळगाव राजा पोलिसांना १९ मार्च रोजी खडकपूर्णा व्यवस्थापन उपविभागाचे सहाय्यक अभियंता एस. जे. तल्हार यांनी तक्रार दिली होती. परंतु, तक्रार देवूनही ठोस कारवाई न झाल्याने महसूल विभागाने धडक कारवाईचे नियोजन केले. 

मजूर फरार.. 

सोमवारी सकाळपासूनच महसूल विभागाने धडक कारवाई सुरू केली होती. दरम्यान, अनेक वाळू उपसा करणाऱ्या अनेक बोटी तस्करांनी  धरणात बुडविल्या. दुसरीकडे दिवसभर शोध मोहीम सुरू ठेवण्यात आली होती. त्यानंतर दुपारी ४  वाजेच्या सुमारास  गारखेड, मंडपगाव, चिंचखेड गावानजीक जलाशयातून उपसा करणाऱ्या ४  फायबर बोटी व इंजन असे एकूण ८ बोटी पकडण्यात आल्या. बोटी सोडून गेल्याने मजूर हाती लागले नाही. शेवटी बोटी  किनाऱ्यावर आणल्यानंतर  स्फोटकांच्या  माध्यमातून नष्ट करण्यात आल्या. दरम्यान, महसूल विभागाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. जेलेटिंगच्या सहाय्याने ४ वेळा स्फोट करीत रात्री ८  वाजेपर्यंत ही कारवाई राबविण्यात आली. 

कारवाई पथक.. 

जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी प्रा.  संजय खडसे यांच्या नेतृत्वात तहसीलदार वैशाली डोंगरजाळ,  नायब तहसीलदार प्रवीण घोटकर, सायली जाधव, मंडळ अधिकारी विजय हिरवे, काशिनाथ ईप्पर, रामदास मांन्टे, अंढेरा मंडळ अधिकारी प्रल्हाद केदार, . ग्राम महसूल अधिकारी विलास नागरे,  परमेश्वर बुरकुल, संजय हाडे, सुरेश डोईफोडे, मधुकर उद्धार, संजय बंराडे, राजू तागवले, आकाश खरात, तेजस शेट्टे, कृष्णा खरात, खडकपूर्णा प्रकल्प विभागाचे अधिकारी एस.जे तल्हार, उद्धव सानप, शोध व बचाव पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तारासिंग पवार, पोलीस कॉन्स्टेबल गुलाबसिंग राजपूत, संदीप पाटील, सलीम बरडे, प्रदीप सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गीते, हेड  कॉन्स्टेबल डिगोळे, ठाकरे आदींनी ही कारवाई पार पडली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »