अंढेरा : देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा येथे शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात २० मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शेकडो शेतकऱ्यांनी अंढेरा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.

नंदकिशोर देशमुख / अंढेरा : देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा मंडळातील दुष्काळ सदृश्य गावांना खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी मिळण्यासाठी अहोरात्र झटणारे शिवनी आरमाळ येथील पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी कैलास नागरे यांनी चिठ्ठी लिहून शासनाच्या दुर्लक्षपणाचे कारण समोर करून आत्महत्या केली. १३ मार्च रोजी शेतात विष प्राशन करून त्यांनी हतबल होऊन जीवन संपविले. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले असून, याप्रकरणी शासनाच्या दुर्लक्षपणाचा निषेध करण्यासाठी शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात २० मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शेकडो शेतकऱ्यांनी अंढेरा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.
अंढेरा मंडळातील १३ गावांना शेतीसाठी खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात यावे, या मागणीसाठी नागरे यांनी अनेक दिवसांपासून लढा उभारला आहे. त्यांनी शिवनी आरमाळ येथे आंदोलन देखील केले होते. त्यानंतर प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. पाण्यासाठी वारंवार शासनाची लक्ष वेधूनही शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे कैलास नागरे हतबल झाले होते. पंचक्रोशीत शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे, ही एकच आर्त मागणी त्यांची होती. अखेर, शासनाने दुर्लक्ष केल्याचे सांगत चार पानांची चिठ्ठी लिहून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. पंचक्रोशीतील शेतीसाठी त्यांनी आपले बलिदान दिले. कैलास नागरे यांनी उभारलेल्या आंदोलनाला व्यापक रूप आता मिळत असून, दुष्काळग्रस्त गावांना पाणी मिळाले, तरच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे शेतकरी नेते प्रकाश पोहरे म्हणालेत. शासनाच्या चुकीच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी २० मार्च रोजी सकाळपासूनच रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आला असून, अंढेरा फाट्यावर शेकडो वाहने अडवण्यात आली आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांचा फौज फाटा दाखल झाला आहे.