Raswanti owner’s honesty : ६६ हजार रुपये ठेवलेली पिशवी विसरून गेलेल्या ग्राहकाला रसवंती मालकाने पिशवी परत करीत प्रामाणिकपणेचे दर्शन घडविले.
नंदकिशोर देशमुख / अंढेरा : ६६ हजार रुपये ठेवलेली पिशवी विसरून गेलेल्या ग्राहकाला रसवंती मालकाने पिशवी परत करीत प्रामाणिकपणेचे दर्शन घडविले. देऊळगावमही येथील तुकाराम शिंगणे यांची खडकपूर्णा नदीजवळ, जालना चिखली मार्गावर रसवंती आहे. १५ मार्चच्या दुपारी ग्राहकाकडून विसरलेली पैशांची पिशवी परत केल्याचे कौतुकास्पद कार्य त्यांनी केले.
शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास विठोबा श्रीपत चित्ते (रा.निमगाव) हे आपले काम आटोपून घरी परत जात होते. दरम्यान, रस पिण्यासाठी ते तुकाराम शिंगणे यांच्या रसवंतीवर थांबले. त्यावेळी आपल्याकडील ६० हजार रुपये ठेवलेली पैशांची पिशवी व २० लाखांची मुदत ठेवीची पावती ते तिथेच विसरले. विठोबा चित्ते हे घरी पोहोचल्यानंतर देखील बऱ्याच वेळ रसवंतीच्या टेबलवर ती पिशवी पडून होती. काही वेळानंतर रसवंती मालक तुकाराम शिंगणे यांची नजर टेबलवर गेली, पिशवी उघडून बघितली असता त्यामध्ये पैशांचे बंडले दिसून आले. त्यानंतर त्यांनी देऊळगाव मही येथील आपल्या नातेवाईकांना संपर्क करून विठोबा चित्ते यांचा शोध घेतला. भ्रमणध्वनीद्वारे त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांना परत बोलावून ६० हजार रोख रक्कम व २० लाखांची मुदत ठेवीची पावती त्यांच्या स्वाधीन केली. यामुळे, तुकाराम शिंगणे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.