Jalna Merchant Bank scam : जालना शहरात गाजत असलेल्या जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आणखी एक मोठी कारवाई करत दुसरा आरोपी निलेश्वर शेषराव भोसले (वय ४६, रा. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा) याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

२३ कोटींच्या अपहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई : न्यायालयाकडून ७ दिवसांची पोलीस कोठडी
जालना : शहरात गाजत असलेल्या जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आणखी एक मोठी कारवाई करत दुसरा आरोपी निलेश्वर शेषराव भोसले (वय ४६, रा. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा) याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात बनावट कागदपत्रांच्या आधारे वेअरहाऊसच्या नावाखाली तब्बल १७७ बनावट खात्यांद्वारे सुमारे २३ कोटी ३३ लाख रुपयांचा अपहार करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चंदनझीरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार रायचंद सखाराम कुरंगळ याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे निलेश्वर भोसले याला ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत त्याचा घोटाळ्यात सक्रिय सहभाग स्पष्ट झाल्याने त्याला अटक करण्यात आली.
या आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी तपास वेगाने करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने कारवाईची गती वाढवली आहे.
ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी उपअधीक्षक सुरेश उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के व त्यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वी केली.
दरम्यान, या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, पुढील तपास सुरू आहे. सरकारी वकील नितीन जाधव यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.


