तेल अवीव : इराण-इस्रायल युद्धाचा पुन्हा भडका उडाला. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ एका ऑईल टँकरला आग लागल्यानंतर भारतीय नौदलाने त्यावरील २४ भारतीय खलाशांची सुटका केली आहे. या जहाजावर हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी अद्याप अधिकृतपणे याची पुष्टी झालेली नाही.

तेल अवीव : इराण-इस्रायल युद्धाचा पुन्हा भडका उडाला. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ एका ऑईल टँकरला आग लागल्यानंतर भारतीय नौदलाने त्यावरील २४ भारतीय खलाशांची सुटका केली आहे. या जहाजावर हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी अद्याप अधिकृतपणे याची पुष्टी झालेली नाही.
इराणने इस्रायलविरुद्धची आपली लष्करी कारवाई तात्पुरती थांबवल्याचे जाहीर केले आहे. मात्र, इस्रायलने लेबनॉन किंवा इतर ठिकाणांवर पुन्हा हल्ला केल्यास, त्याला पूर्वीपेक्षा अधिक कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही इराणने दिला आहे. अमेरिका युद्धविराम आणि शांतता करारासाठी सक्रियपणे प्रयत्न करत आहे. इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांना हा संघर्ष संपवायचा आहे आणि अंतिम कराराबाबतची चर्चा प्रगतीपथावर आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला आहे. जोपर्यंत करार होत नाही तोपर्यंत इराणवर लादलेले निर्बंध कायम राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लष्करी आणि संरक्षण तळांवर हल्ले
एप्रिलमध्ये इराण आणि इस्रायल यांच्यात झालेल्या युद्धविरामानंतर दोन महिन्यांनी पुन्हा संघर्ष सुरू झाला आहे. इराणने रविवारी रात्री इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. लेबनॉनमधील हिजबुल्लाहवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने म्हटले आहे. प्रत्युत्तरादाखल, इस्रायलने इराणच्या अनेक लष्करी आणि संरक्षण तळांवर हल्ला केला. तेहरान, तब्रीझ आणि इस्फाहानमध्ये अनेक स्फोट झाले. या हल्ल्यांमध्ये इस्रायलने हवाई-प्रक्षेपित बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचा दावा केला जात आहे.
तात्काळ हल्ले थांबवा : डोनाल्ड ट्रम्प
शस्त्रसंधी लागू असतानाच इस्रायल आणि इराणमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाला. दोन्ही देशांनी हवाई हल्ले केले. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यात उडी घेत इस्रायल आणि इराणने एकमेकांवर सुरू केलेले हल्ले त्वरित थांबवले पाहिजे, असे सांगितले. या ताज्या युद्ध संघर्षांमुळे अमेरिका आणि इराण दरम्यान सुरू असलेल्या वाटाघाटी विस्कळीत होणार नाहीत, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, सुरू असलेल्या राजनैतिक प्रयत्नांनंतरही तणाव वाढलेला असल्यामुळे ‘इस्रायल आणि इराणने त्वरित ‘हल्ले’ थांबवले पाहिजेत.


