वाशिम : शेतकऱ्यांच्या शेतीतील सोलर प्लेट, मोटार पंप व इतर साहित्य चोरणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून ३ लाख ४५ हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींनी वाशिम जिल्ह्यात ७ ते ८ चोऱ्या केल्याची कबुली दिल्याने आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

कळंबा महाली येथील शेतकरी प्रल्हाद आत्माराम महाले यांच्या शेतातून २ जूनच्या रात्री सोलरच्या नऊ प्लेट चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला. घटनास्थळावरील माहिती, साक्षीदारांचे जबाब आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित विठ्ठल मंगलदास भगत (रा. पंचशील नगर, वाशिम) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने प्रकाश रवि जाधव (रा. गवळीपुरा, वाशिम) आणि गजानन विश्वनाथ कावरखे (रा. गोरेगाव, जि. हिंगोली, सध्या निमजगा, वाशिम) यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी उर्वरित दोन्ही आरोपींनाही अटक केली. आरोपींकडून दोन सोलर प्लेट, १०० कट्टे हळद (बेन), दोन मोटारसायकली आणि ७.५ एचपी क्षमतेचा मोटार पंप असा एकूण ३ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान आरोपींनी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये ७ ते ८ चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे आणखी चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सपोनि योगेश धोत्रे आणि त्यांच्या पथकाने केली.