वाशिम : ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि टोल कर्मचाऱ्यांच्या मदतीने तोंडगाव फाटा येथील टोल नाक्यावर मोठी कारवाई करत ६ लाख ५० हजार ५०० रुपयांच्या नकली नोटा आणि १५ लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ जप्त केली. या कारवाईत राजस्थानातील एका युवकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याचे साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. एकूण २१ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्कॉर्पिओत सापडल्या ६.५० लाखांच्या नकली नोटा; राजस्थानचा युवक ताब्यात
वाशिम : ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि टोल कर्मचाऱ्यांच्या मदतीने तोंडगाव फाटा येथील टोल नाक्यावर मोठी कारवाई करत ६ लाख ५० हजार ५०० रुपयांच्या नकली नोटा आणि १५ लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ जप्त केली. या कारवाईत राजस्थानातील एका युवकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याचे साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. एकूण २१ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास लाखाळा येथील दुकानदार विष्णू ढवळे यांना काही व्यक्तींनी नकली नोट देऊन फसवणूक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संबंधित आरोपी राजस्थान पासिंगच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून हिंगोलीच्या दिशेने निघाल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल, वाशिम ग्रामीणच्या ठाणेदार श्रीदेवी पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि शेखर मास्कर यांच्या नेतृत्वाखाली तीन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. टोल कर्मचाऱ्यांना सतर्क करून संशयित वाहनाचा शोध सुरू करण्यात आला. रात्री सुमारे नऊ वाजता तोंडगाव फाटा येथील टोल नाक्यावर संशयित स्कॉर्पिओ अडविण्यात आली. पोलिसांना पाहताच वाहनातील काही जण पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. यावेळी पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले, तर इतर आरोपी शेतातून जंगलाच्या दिशेने फरार झाले.
ताब्यात घेतलेल्या युवकाने आपले नाव आशिक अली मोहम्मद मुजाहिद (वय २१, रा.हरसोर,राजस्थान) असल्याचे सांगितले. त्यानंतर वाहनाची झडती घेतली असता एका रुमालामध्ये ठेवलेल्या ‘ चिल्ड्रेन्स बँक ऑफ इंडिया’ असे छापलेल्या १,३०० नकली नोटा आढळून आल्या. त्यांची किंमत ६ लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय दोन खऱ्या चलनी नोटा आणि फिर्यादीकडील एक नोटही जप्त करण्यात आली. या कारवाईत ६ लाख ५० हजार ५०० रुपयांच्या नकली नोटांसह १५ लाख रुपये किमतीची राजस्थान पासिंग स्कॉर्पिओ (आरजे-०१-यूबी-७४१६) जप्त करण्यात आली. त्यामुळे एकूण २१ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. या प्रकरणी विष्णू प्रकाश ढवळे (रा. लाखाळा, ता. जि. वाशिम) यांच्या फिर्यादीवरून वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि राहुल गंधे करीत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल, ठाणेदार श्रीदेवी पाटील, पोउपनि शेखर मास्कर आणि त्यांच्या पथकाने केली.
आठ दिवसांत ३० लाखांच्या बनावट नोटा जप्त
२९ मे रोजी अमानी येथील पेट्रोल पंपावर २३.५० लाखांच्या बनावट नोटा जप्त झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसांत तोंडगाव टोल नाक्यावर आणखी १० लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. दोन्ही प्रकरणे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली असून जिल्ह्यात आठ दिवसांत जवळपास एकूण ३० लाख ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा पर्दाफाश झाला आहे. अमानी आणि तोंडगाव येथे ‘चिल्ड्रेन्स बँक’च्या नोटा आढळल्या आहेत.


