बुलढाणा : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संचालित बिरसिंगपूर येथील मॉडेल डिग्री कॉलेजच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन गुरूवारी ना. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

बुलढाणा : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संचालित बिरसिंगपूर येथील मॉडेल डिग्री कॉलेजच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन गुरूवारी ना. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार संजय गायकवाड, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, वित्त व लेखा अधिकारी सीए पुष्कर देशपांडे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉक्टर नागरे, मॉडेल डिग्री कॉलेजचे मानद संचालक डॉ. ए.आर. म्हळसने, कार्यकारी अभियंता जे.एन. काळे, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तसेच बिरसिंगपूरच्या सरपंच वैशाली शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना ना. प्रतापराव जाधव म्हणाले, बुलढाणा हा शैक्षणिकदृष्ट्या मागे असला तरी, आता जिल्ह्यात मॉडेल डिग्री कॉलेज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कृषी महाविद्यालयासारख्या संस्था उभ्या राहत आहेत. या शैक्षणिक व पायाभूत सुविधांमुळे जिल्ह्याचा कायापालट होणार असून, सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहोत. आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागत होते. पंरतु आता मॉडेल डिग्री कॉलेजमुळे जिल्ह्यातच गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम उच्च दर्जाचे व्हावे, अशा सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. भुमीपूजन सोहळ्याचे अध्यक्षीय भाषण संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी, तर सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी केले.


