पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरीता मंदिरापेक्षाही मोठे असून त्यांचे जतन आणि संवर्धनाचे काम राज्य शासनाच्यावतीने सातत्याने सुरु आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरीता मंदिरापेक्षाही मोठे असून त्यांचे जतन आणि संवर्धनाचे काम राज्य शासनाच्यावतीने सातत्याने सुरु आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे, बापूसाहेब पठारे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे योद्धे असण्यासोबतच उत्तम प्रशासक होते. विविध व्यवस्थापनाचे गुरु होते, शिवरायांनी आपले संपूर्ण आयुष्य जनतेच्या कामी लावले म्हणून आदर्श राजा, जाणता राजा, श्रीमंत योगी म्हणून आपण त्यांचे स्मरण करतो. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे विविध विकास कामे सुरु आहेत. त्याचप्रमाणे शिवनेरीचाही विकास करण्यात येत आहे. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून कसल्याही प्रकारची अतिक्रमणे राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात येत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
12 गड किल्ले जागतिक वारसास्थळे होतील
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील 12 गड किल्ले नामांकनासाठी निवडले आहेत. हे गडकिल्ले स्थापत्यशास्त्र, जलसंवर्धन, पर्यावरणशास्त्राचे उत्तम नमुना असून याबाबत पॅरिस येथील होणाऱ्या महासभेत येत्या आठवड्यात सादरीकरण करण्यात येणार आहे. हे गड किल्ले जागतिक वारसास्थळे होतील आणि जगातील लोक ते बघण्याकरीता येतील, अशा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
शिवरायांना अभिप्रेत सुराज्य निर्माण करण्यासाठी कटीबद्ध – शिंदे
छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘सर्वसमावेशक कारभार’ डोळ्यासमोर ठेवून काम करण्यात येत असून त्यांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध आहे, लोकल्याणकारी राज्य निर्मितीकरीता यापुढेही प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाही – अजित पवार
छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट, किल्ले खऱ्याअर्थाने त्यांची दौलत आहे, ते आपले शक्तीस्थान, स्फूर्तीस्थान असून त्यांचे जतन, संवर्धन करणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्यशासनाच्यावतीने किल्ले शिवनेरी, रायगड, प्रतापगड, सिंहगड, पुरंदर आदी किल्ले परिसरात विविध विकासकामे करीत आहेत, किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
50 कोटी निधीची मुख्यमंत्र्यांची घोषणा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य, स्वधर्म व स्वभाषा या त्रिसुत्रीवर आधारित शिवसृष्टी येथे मांडण्यात आलेले दालन अत्यंत प्रेरणादायी असून महाराष्टातील व देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी या शिवसृष्टीला प्रेरणा आणि अभ्यासाचे केंद्र म्हणून भेट द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण प्रसंगी केले. शिवसृष्टीच्या पुढील टप्प्याचे काम अधिक वेगाने व्हावे, यासाठीही राज्य शासनाकडून आणखी 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.