cricket bookies busted in Akola : चॅम्पियन्स ट्रॉफीला बुधवारपासून सुरुवात होत नाही, तोच अकोल्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत सट्टेबाजांच्या आंतरराज्यीय गँगचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी २८ लाख ३६ हजार २६५ रुपयांच्या मुद्देमालासह ३३ आरोपींना ताब्यात घेतले आहे.
अकोला : चॅम्पियन्स ट्रॉफीला बुधवारपासून सुरुवात होत नाही, तोच अकोल्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत सट्टेबाजांच्या आंतरराज्यीय गँगचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी २८ लाख ३६ हजार २६५ रुपयांच्या मुद्देमालासह ३३ आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सर्व आरोपींविरूद्ध ६०/२०२५ कलम ३१८ (४), ११२ (२), ३ (५) भारतीय न्याय सहिंता सहकलम ४,५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्शिटाकळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कातखेड शिवारात रविंद्र विष्णुपंत पांडे यांच्या शेतातील एका इमारतीत ऑनलाईन सट्ट्याचा खेळ सुरू असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना मिळाली. या आधारे त्यांनी घटनास्थळी छापेमारी करत कारवाई केली. या दरम्यान घटनास्थळावर क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, टेबल टेनिस, बास्केटबॉल, हॉलीबॉल, कसिनोगेम, पेड ऑनलाईन गेम इत्यादी गेमचा व्हॉट्सअॅप, टेलीग्राम इत्यादी सोशल मिडिया ग्रुपवर जाहिरात करुन ग्राहकांकडून ऑनलाइन पैसे घेवून त्यांची आयडी तयार करून देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. आरोपींकडून १२ लॅपटॉप, ११३ मोबाईल, १० बँकेचे पासबूक, २ पासपोर्ट, १३ एटीएम कार्ड, इंटरनेट राऊटर १२ व मोडेम, जुगार खेळण्यासाठी वापरलेली सर्व साहित्य जप्त करण्यात आले. पुढील तपास पोलीस अधीक्षक बच्चनसिंह यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा करीत आहेत.
पाच राज्यांतील आरोपींचा समावेश
या प्रसंगी पोलिसांनी ३३ आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये सहा आरोपी गुजरात, तीन आरोपी उत्तर प्रदेश, बिहार व मध्य प्रदेशातील प्रत्येकी १ आरोपी आणि महाराष्ट्रातील चंद्रपूर, पूणे, मुंबई , अमरावती व बुलढाणा येथील ८ व अकोला जिल्ह्यातील १४ आरोपींचा समावेश आहे.
अकोल्यातील हॉटेल व्यवासायिकाचा सहभाग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवता रोडवरील फार्म हा रविंद्र विष्णुपंत पांडे (६३) (रा. कातखेड ता. बार्शिटाकळी जि. अकोला) यांच्या मालकीचा आहे. ते अकोल्यातील एका मोठ्या हॉटेलचे संचालक असून त्यांनी हा फार्म जुगार चालविण्यासाठी संजय गुप्ता व मोनीश गुप्ता यांना अवैध रितीने उपलब्ध करून दिला होता. मोनिश निरंजन गुप्ता व संजय गुप्ता यांनी फरार आरोपी महेश डिक्कर (रा. लोहारी ता. अकोट) यांच्या माध्यमातून अटक आरोपींची टोळी जमवून आरोपींना ऑनलाइन जुगारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या.