रिसोड : पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी सायंकाळी रिसोड शहरात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. जय अहिल्या व्यायाम शाळेच्या वतीने आयोजित या मिरवणुकीत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. टाळ-मृदुंगांचा गजर, ढोल-ताशांचा निनाद आणि अहिल्यादेवींच्या जयघोषाने संपूर्ण शहर परिसर भक्तिमय व उत्सवी वातावरणाने भारावून गेला.

धनगर गल्ली येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला. आसन गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सराफ लाईन, बबेरवाल चौक, जैन गल्ली, परशुराम चौक, अष्टभुजा देवी चौक आणि मुल्ला गल्ली मार्गे पुन्हा धनगर गल्ली येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली. मार्गभर नागरिकांनी पुष्पवृष्टी करून मिरवणुकीचे स्वागत केले.

मिरवणुकीत युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषा, भगवे ध्वज, टाळ-मृदुंग पथके, ढोल-ताशांचा गजर आणि आकर्षक सजावटीमुळे मिरवणूक विशेष लक्षवेधी ठरली.
यावेळी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या आदर्श विचारांचा वारसा जपत समाजहितासाठी कार्य करण्याचा संदेशही देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जय अहिल्या व्यायाम शाळेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.