Hearts are with BJP : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने २७ वर्षांनंतर स्पष्ट बहुमत प्राप्त केले. राष्ट्रीय राजधानीत आम आदमी पक्षाला (आप) सत्तेतून बाहेर काढत भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली. आपचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि मंत्री सौरभ भारद्वाज यांच्यासह सत्ताधारी पक्षाचे अनेक प्रमुख नेत्यांचा या निवडणुकीतील पराभव म्हणजे भाजपसाठी मोठे यश म्हणावे लागेल.
Hearts are with BJP : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने २७ वर्षांनंतर स्पष्ट बहुमत प्राप्त केले. राष्ट्रीय राजधानीत आम आदमी पक्षाला (आप) सत्तेतून बाहेर काढत भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली. आपचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि मंत्री सौरभ भारद्वाज यांच्यासह सत्ताधारी पक्षाचे अनेक प्रमुख नेत्यांचा या निवडणुकीतील पराभव म्हणजे भाजपसाठी मोठे यश म्हणावे लागेल. तथापि, कालकाजी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री आतिशी मार्लेना विजयी झाल्या आहेत. भाजपने दिल्लीतील ७० पैकी ४८ जागा जिंकून देशाचे लक्ष दिल्लीकडे खेचले आहे. पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रीय राजधानीत आपले खाते उघडू शकले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याला “प्रचंड जनादेश” म्हटले आणि राजधानीचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी आणि लोकांचे जीवन सुधारण्यासाठी ते कोणतीही कसर सोडणार नाहीत असे सांगितले. दिल्लीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तेथील लोकांचे जीवन चांगले करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही, ही आमची हमी आहे, असे मोदींनी या निकालानंतर स्पष्ट करून आम्ही हे देखील सुनिश्चित करू की विकसित भारताच्या निर्मितीमध्ये दिल्ली महत्त्वाची भूमिका बजावेल, असे सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणूक निकालांवर भाष्य करताना म्हटले आहे की, दिल्लीतील लोकांनी खोटेपणा, कपट आणि भ्रष्टाचाराचा ‘शीशमहाल’ उद्ध्वस्त करून दिल्लीला ‘आपदा’मुक्त करण्याचे काम केले आहे. दिल्लीने आश्वासने मोडणाऱ्यांना असा धडा शिकवला आहे की देशभरातील जनतेला खोटी आश्वासने देणाऱ्यांसाठी ते एक उदाहरण ठेवेल. दिल्लीत विकास आणि विश्वासाच्या एका नवीन युगाची ही सुरुवात आहे. दिल्लीच्या जनतेने दाखवून दिले आहे की वारंवार खोट्या आश्वासनांनी जनतेची दिशाभूल केली जाऊ शकत नाही. गलिच्छ यमुना, घाणेरडे पिण्याचे पाणी, तुटलेले रस्ते, तुंबलेले गटार आणि प्रत्येक रस्त्यावर उघडी असलेली दारूची दुकाने यांना जनतेने त्यांच्या मतांनी प्रतिसाद दिला आहे. भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर, मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांबद्दल अटकळांची फेरी सुरू झाली. या शर्यतीत, नवी दिल्ली मतदारसंघात केजरीवाल यांचा ४,०८९ मतांनी पराभव करणारे परवेश वर्मा हे प्रमुख दावेदार म्हणून उदयास आले आहेत. या निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे केला होता.
दिल्लीत ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत १.५५ कोटी पात्र मतदारांपैकी ६०.५४ टक्के लोकांनी मतदान केले होते. आणि त्या मतदारांपैकी बहुतांश मतदारांनी कमळाला आपली पसंती दर्शवली.
केवळ ६७५ मतांनी पराभूत झालेल्या सिसोदिया यांनी आपला पराभव स्वीकारला आणि भाजप लोकांच्या कल्याणासाठी काम करेल अशी आशा व्यक्त केली.
अण्णा चळवळीतून नेता म्हणून उदयास आलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने २०१५ मध्ये ६७ जागा जिंकून सरकार स्थापन केले आणि २०२० मध्ये ६२ जागा जिंकून सत्तेत शानदार पुनरागमन केले होते. यापूर्वी, २०१३ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत ‘आप’ने २८ जागा जिंकल्या होत्या पण ते सत्तेपासून दूर राहिले. नंतर, आठ काँग्रेस आमदारांच्या पाठिंब्याने केजरीवाल पहिल्यांदाच दिल्लीचे मुख्यमंत्री बनले. १९९३ मध्ये भाजपने दिल्लीत सरकार स्थापन केले होते. त्या निवडणुकीत त्यांना ४९ जागा मिळाल्या होत्या. यानंतर, २०२० पर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. २०१५ च्या निवडणुकीत भाजप फक्त तीन जागांवर घसरला, तर २०२० च्या निवडणुकीत त्यांच्या जागांची संख्या आठ झाली.
पर्यायी आणि प्रामाणिक राजकारणाने भ्रष्टाचाराशी लढण्याचे आश्वासन देऊन राजकारणात उतरलेल्या केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाला या निवडणुकीपूर्वी अनेक आरोपांना सामोरे जावे लागले आणि त्यांच्या अनेक नेत्यांना तुरुंगातही जावे लागले.
या निवडणुकीत भाजपने केजरीवाल आणि आप यांच्या कथित भ्रष्टाचार आणि गैरकारभाराला मुख्य मुद्दा बनवले आणि दारू घोटाळ्यापासून ते ‘शीशमहाल’च्या बांधकामापर्यंतचे आरोप करून दिल्लीतील ‘आप-दा’शी जोडले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या मुद्द्यांवर सतत हल्लाबोल केला.
या आरोपांद्वारे भाजपने केजरीवाल यांच्या ‘कट्टर प्रामाणिक माणसा’ या प्रतिमेवर हल्ला केला आणि तो जनतेत चर्चेचा विषय बनवला. तसेच, भाजपने विकासाच्या तथाकथित ‘केजरीवाल मॉडेल’ला ‘आपत्ती’ म्हटले आणि त्याच्या विरोधात विकासाचे ‘मोदी मॉडेल’ सादर केले. आणि अखेर दिल्लीवासियांनी आपले दिल भाजपलाच दिले…!