Sonia Gandhi : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी सोमवारी दावा केला की १४ कोटी पात्र भारतीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत मिळणाऱ्या लाभांपासून वंचित आहेत. सर्व पात्र व्यक्तींना अन्न सुरक्षा कायद्याचा लाभ मिळावा, यासाठी सरकारने लवकरात लवकर जनगणना करावी, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली.
नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी सोमवारी दावा केला की १४ कोटी पात्र भारतीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत मिळणाऱ्या लाभांपासून वंचित आहेत. सर्व पात्र व्यक्तींना अन्न सुरक्षा कायद्याचा लाभ मिळावा, यासाठी सरकारने लवकरात लवकर जनगणना करावी, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली.
राज्यसभेत शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी असेही सांगितले की अन्न सुरक्षा हा विशेषाधिकार नाही तर नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. सोनिया गांधी म्हणाल्या की, अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत, ग्रामीण भागातील ७५ टक्के आणि शहरी भागातील ५० टक्के लोकांना अनुदानित धान्य मिळण्याचा अधिकार आहे. तथापि, लाभार्थ्यांसाठी कोटा अजूनही २०११ च्या जनगणनेच्या आधारे निश्चित केला जातो, जो आता एक दशकाहून अधिक जुना आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच जनगणनेला ४ वर्षांहून अधिक विलंब झाला आहे. मूळतः २०२१ मध्ये जनगणना होणार होती, परंतु जनगणना कधी होणार? याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. अर्थसंकल्पीय वाटपावरून असे दिसून आले की यावर्षीही जनगणना होण्याची शक्यता कमी आहे.
पात्र भारतीय अन्न सुरक्षा लाभापासून वंचित
सोनिया गांधी म्हणाल्या की, अशा प्रकारे, सुमारे १४ कोटी पात्र भारतीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत त्यांच्या योग्य लाभांपासून वंचित राहत आहेत. सरकारने लवकरात लवकर जनगणना करण्याला प्राधान्य देणे आणि सर्व पात्र व्यक्तींना अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत हमी दिलेले फायदे मिळतील याची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्न सुरक्षा हा विशेषाधिकार नाही, तो एक मूलभूत अधिकार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा ऐतिहासिक उपक्रम होता
संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारने आणलेला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा हा १४० कोटी लोकसंख्येसाठी अन्न आणि पोषण सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने एक ऐतिहासिक उपक्रम होता. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा हा २०१३ मध्ये लागू झालेला एक सामाजिक कल्याणकारी कायदा आहे. अनुदानित किमतीत पुरेसे अन्नधान्य उपलब्ध करून देऊन पात्र लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट असल्याचे सोनिया गांधी यांनी सांगितले.