Buldhana District Cooperative Bank : ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, कारागीर, व्यावसायीक व नोकरदार यांना बुलढाणा जिल्हा बँकेमार्फत विविध प्रकारच्या कर्जाचे वाटप करण्यात येतो. थकीत कर्जाचे वसूली करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या कर्जाची परतफेड होऊन बँकेच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी बँकेने नाविन्यपूर्ण व्याज सवलत योजना जाहीर केली आहे.
बुलढाणा : ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, कारागीर, व्यावसायीक व नोकरदार यांना बुलढाणा जिल्हा बँकेमार्फत विविध प्रकारच्या कर्जाचे वाटप करण्यात येतो. थकीत कर्जाचे वसूली करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या कर्जाची परतफेड होऊन बँकेच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी बँकेने नाविन्यपूर्ण व्याज सवलत योजना जाहीर केली आहे. या योजनेचा शेतकरी व सर्व थकीत कर्जदार सभासदांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अ. वा. खरात यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, कारागीर, व्यावसायीक व नोकरदार यांची स्वतःची हक्काची व जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील अग्रणी म्हणून ओळख असलेल्या बुलडाणा जिल्हा बँकेमार्फत वर्षानुवर्ष विविध प्रकारच्या कर्जाचे वाटप, ठेवीचे संकलन व शासनाच्या विविध योजनांचे निधी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बँकेच्या सभासदांपर्यंत पोहचविण्याचे काम होत आहे. सन 2016 मध्ये राज्य शासन व केंद्र शासनाव्दारे बँकेस 207 रुपय कोटीची मदत मिळाल्यामुळे जिल्हा बँकेचे व्यवहार पूर्ववत सुरु होऊन बँक कोअर बँकींग तसेच अत्याधुनिक व डिजीटल सुविधांसह (जसे ATM, KCC CARD, RTGS, NEFT.QR Code, मोबाईल बँकींग (View Only), मोबाईल व्हॅन, गॅस तसेच सर्व प्रकारचे अनुदान, निराधार पेंशन इत्यादी) ग्रामीण व शहरी भागातील ग्राहकांच्या सेवेत कार्यरत झालेली आहे. जिल्हा बँकेचे आर्थिक सक्षमीकरण होण्याकरीता नियोजनबध्द कृती आराखडा तयार करण्यात येऊन त्याप्रमाणे प्रत्यक्ष कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती सुधारत आहे.
बँकेने बिगरशेती तसेच शेती कर्जाच्या प्रभावी वसुलीसाठी कृती आराखडा तयार केला असून त्याची अंमलबजावणी सुरु आहे. सद्यास्थितीत एकूण 51.62 टक्के एनपीए पैकी 48.86 टक्के एनपीए शेती कर्जाचा आहे. बँकेच्या एकूण थकीत कर्जापैकी शेती कर्जाचे थकीताचे प्रमाण 66.13 टक्के असून 567 ग्रामसेवा सहकारी संस्थांच्या 28478 सभासदांकडे मुद्दल व व्याज मिळून एकूण 256 कोटी रुपयांचे कर्ज एनपीए झालेले आहे. बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यासाठी कर्ज वसुल होणे अत्यंत आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या कर्जाची परतफेड होऊन ते बँकेच्या मुख्य प्रवाहात यावेत व बँकेची आर्थिक स्थिती सुधारावी याकरीता बँकेने आकर्षक अशी नाविन्यपूर्ण व्याज सवलत योजना जाहीर केली असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी एकरकमी परतफेड केल्यास त्यांना मोठया प्रमाणावर व्याजात सुट मिळणार आहे.
यामध्ये अल्प मुदती पिक कर्जाकरीता 25 हजार रुपयेपर्यंत फक्त मुद्दल व रक्कम भरुन व 25 हजार रुपये रक्कमेवर मुद्दल रक्कमेच्या 25 टक्के व्याज रक्कम भरुन खाते निरंक होणार आहे. तसेच मध्यम दिर्घ मुदती करीता मुद्दल रक्कम अधिक मुद्दल कर्जबाकीच्या 50 टक्के व्याज रक्कम भरुन खाते निरंक होणार आहे. तरी कर्ज वसुलीबाबतची कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेऊन आपली थकीत कर्जखाती निरंक करुन बँकींग व्यवस्थेच्या मुख्य प्रणालीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात यांनी केले आहे.