छत्रपती संभाजीनगर : शहरातील महिला सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या दामिनी पथकाला अधिक सक्षम करण्यासाठी दहा अतिरिक्त महिला पोलिस अंमलदार देण्यात आल्या आहेत. शहरातील महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे आणि दामिनी पथकाच्या कार्यक्षमतेत वाढ व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर : शहरातील महिला सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या दामिनी पथकाला अधिक सक्षम करण्यासाठी दहा अतिरिक्त महिला पोलिस अंमलदार देण्यात आल्या आहेत. शहरातील महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे आणि दामिनी पथकाच्या कार्यक्षमतेत वाढ व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील महिला सुरक्षा आता अधिक बळकट होणार आहे.
शहरातील विविध महाविद्यालये आणि अन्य पर्यटनस्थळी महिलांची सुरक्षा व्हावी यासाठी दामिनी पथकाचे काम दिवस आणि रात्री सुरू असते. त्यामुळे अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची गरज होती. नव्या दहा महिला पोलिस अंमलदारांच्या नियुक्तीमुळे शहरातील महिला सुरक्षेच्या उपाययोजनांना अधिक बळ मिळणार आहे. यासोबतच, लवकरच पथकाला चार नवीन वाहनेही दिली जाणार आहेत. यामुळे गस्त अधिक जलद आणि प्रभावी होईल, तसेच महिलांच्या मदतीसाठी दामिनी पथक तत्काळ पोहोचू शकरणार आहे.
पथक करणार जनजागृतीचे काम – पोलीस आयुक्त
शहराच्या व्याप्तीच्या अनुषंगाने दामिनी पथक हे केवळ महिला सुरक्षेपुरतेच मर्यादित नसून, बालविवाह रोखण्यासाठी तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेत आहे. विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते कार्यरत आहे. शहरातील महिलांना कोणत्याही प्रकारच्या छेडछाड, अत्याचार किंवा गैरवर्तनाला सामोरे जावे लागू नये, यासाठी दामिनी पथकाच्या गस्त वाढवण्यात आली आहे. या निर्णयामुळे महिला आणि मुलींना अधिक सुरक्षित वातावरण मिळणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली.