बुलढाणा : गांधी शिशु मंदिरातील आकाशदिवे बनवण्याचा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेचे दर्शन घडविणारा आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि कलागुणांना प्रोत्साहन मिळाले आहे. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या रंगाचे आकार आणि विविध कागदांचा वापर करून कल्पकतेने आकाशदिवे तयार केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो त्यांना आपले सण, उत्सव परंपरा माहित होतात.

बुलढाणा : गांधी शिशु मंदिरातील आकाशदिवे बनवण्याचा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेचे दर्शन घडविणारा आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि कलागुणांना प्रोत्साहन मिळाले आहे. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या रंगाचे आकार आणि विविध कागदांचा वापर करून कल्पकतेने आकाशदिवे तयार केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो त्यांना आपले सण, उत्सव परंपरा माहित होतात. या उपक्रमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मंगेश वाघमारे यांनी केले.
ते बुलढाणा येथील गांधी शिशु मंदिरमध्ये दीपावली उत्सवानिमित्त आयोजित आकाशदिवे बनवणे स्पर्धेच्या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मंगेश वाघमारे यांच्यासह दैनिक महाभूमिचे कार्यकारी संपादक ब्रह्मानंद जाधव, गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक काळे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि पालकांच्या मदतीने तयार केलेल्या रंगीबेरंगी आकाश दिव्यांनी येथील गांधी शिशु मंदिर उजळून निघाले. गांधी शिशु मंदिरात शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी नेहमीच विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन केले जाते. यावेळी दीपावली सणाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी कागदी आकाशकंदील तयार करण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सर्व आकाशकंदिलाचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ शिक्षक पंडितकर, मुख्याध्यापिका अनिता खक्के, वर्गशिक्षिका अंजली खंदारकर, रेवती देशपांडे, अर्चना गवई, रोशनी जाधव, वनिता रहाटे यांची उपस्थिती होती. स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
सण-उत्सवावर आधारित उपक्रमांची गरज : ब्रम्हानंद जाधव
दैनिक महाभूमिचे कार्यकारी संपादक ब्रम्हानंद जाधव म्हणाले आज अनेक मुले स्मार्ट फोनच्या आहारी गेल्याचे आपण बघतो. एका सर्वेनुसार 12 वर्षापर्यंतच्या 60 टक्के मुलांमध्ये मोबाईलचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. मुलांना मोबाईलमध्ये गुंतवूण न ठेवता शाळांमध्ये होणाऱ्या उपक्रमांमध्ये भाग घ्यायला लावला पाहिजे. शाळांनी अशा स्पर्धा घेतल्याने मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळतो. मुलांना आपल्या सण, उत्सवाची आणि परंपराची माहिती होण्यासाठी सण-उत्सवावर आधारित अशा उपक्रमांची आज गरज आहे. सण-उत्सवावर आधारित हे उपक्रम संस्कृतीचे जतन करतात, समाजाला एकत्र आणतात, चांगल्या मूल्यांची शिकवण देतात आणि सर्वांना एकत्र येऊन आनंद साजरा करण्याची संधी देतात, असे सांगूण गांधी शिशू मंदिरात आयोजित आकाशदिवे बनवण्याच्या या उपक्रमाचे ब्रम्हानंद जाधव यांनी कौतूक केले.
