अंढेरा : पोलीस स्टेशन हद्दीतून मोबाईल चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी विशेष शोध मोहीम राबविली. ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईत एकूण सहा मोबाईल आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

अंढेरा : पोलीस स्टेशन हद्दीतून मोबाईल चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी विशेष शोध मोहीम राबविली. ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईत एकूण सहा मोबाईल आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
गत काही दिवसांमध्ये मोबाईल चोरीच्या घटना वाढल्याचे दिसून आले. याप्रकरणी अंढेरा पोलिसांनी तपास सुरू केला होता. दरम्यान, पिंपरी आंधळे येथील योगेश आंधळे यांनी मोबाईल चोरीच्या घटनेची तक्रार दिली होती. त्यानुसार, अनुषंगिक तपासामध्ये सीसीटीव्ही फुटेज आणि लाईव्ह लोकेशन पोलिसांना मिळाले. यावरून पोलिसांनी मोबाईल चोरट्यांना ताब्यात घेतले. अमोल गजानन वाघ (२४ वर्ष) रा. गवळीपुरा, ता. चिखली असे आरोपीचे नाव आहे. आरोपी सोबत एक विधी संघर्षग्रस्त बालक देखील असल्याची माहिती आहे. दोघांकडून सहा मोबाईल आणि स्कुटी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून चौकशी सुरू आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जारवाल, हवालदार सिद्धार्थ सोनकांबळे, शिपाई नितीन फुसे, किशोर जाधव, माधुरी इंगळे यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. विशेष म्हणजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शक्करगे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया झाली होती. कर्तव्यावर रुजू झाल्यावर त्यांनी आरोपींना पकडण्यात महत्त्वाचे योगदान दिले. यामुळे त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
