वाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील येडशी येथे घरफोडी करून सोने-चांदीचे दागिने चोरणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा, वाशिमच्या पथकाने अटक केली असून, चोरीस गेलेला ४ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल शंभर टक्के हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.

वाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील येडशी येथे घरफोडी करून सोने-चांदीचे दागिने चोरणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा, वाशिमच्या पथकाने अटक केली असून, चोरीस गेलेला ४ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल शंभर टक्के हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी प्रविण तायडे (रा. मेडशी, ता. मालेगाव) यांनी १२ मे रोजी मंगरुळपीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या माहेर असलेल्या येडशी येथील घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील सोने-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना ११ मेच्या रात्री घडली होती. याप्रकरणी मंगरुळपीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला. पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. तपासादरम्यान चोरी करणारा आरोपी हा येडशी येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी पुणे येथे फरार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने पुण्यात जाऊन त्याचा शोध घेतला.
तांत्रिक माहितीच्या आधारे संघदीप चंदू वानखडे (रा. येडशी, ता. मंगरुळपीर) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. चौकशीत चोरीतील सोने-चांदी शेलूबाजार येथील दोन सोनारांना विकल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष कारवाई करून ५२ ग्रॅम सोने व ४२ ग्रॅम चांदी असा एकूण ४ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपीला पुढील कारवाईसाठी मंगरुळपीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याने इतर ठिकाणीही अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्या आहेत का, याचा तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षिरसागर, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोलीस निरीक्षक किशोर शेळके तसेच स्थानिक गुन्हे शाखा व मंगरुळपीर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.


