रिसोड : बसस्थानक परिसरातून चोरी गेलेला तब्बल ६ लाख १२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल काही तासांत शोधून काढत रिसोड पोलिसांनी तत्परतेचे दर्शन घडविले. या प्रकरणी एका महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा संपूर्ण ऐवज जप्त करण्यात आला.

बसस्थानकावरील चोरीचा काही तासांत उलगडा; संशयित महिलेला हिंगोलीत पकडले
रिसोड : बसस्थानक परिसरातून चोरी गेलेला तब्बल ६ लाख १२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल काही तासांत शोधून काढत रिसोड पोलिसांनी तत्परतेचे दर्शन घडविले. या प्रकरणी एका महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा संपूर्ण ऐवज जप्त करण्यात आला.
फिर्यादी सुनंदा बळीराम धांडे (वय ५९, रा. कमलानगर, ता. शहापूर, जि. ठाणे) या रिसोड येथील नातेवाईकांकडे आल्या होत्या. त्या २० मे रोजी दुपारी ठाणे येथे परत जाण्यासाठी रिसोड बसस्थानकावर आल्या असता त्यांच्या पर्समधील एक छोटी पर्स चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्या पर्समध्ये सोन्याची पोत, दोन कर्णफुले, एक अंगठी, मोबाईल फोन व २ हजार ८०० रुपये रोख असा एकूण ६ लाख १२ हजार ८०० रुपयांचा ऐवज होता.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी तातडीने पथक रवाना करून बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. तसेच सायबर शाखेच्या मदतीने मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सेनगाव (जि. हिंगोली) परिसरात पाठलाग करत खासगी प्रवासी वाहनांची तपासणी केली.
यावेळी एका वाहनातील महिलेच्या संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी चौकशी केली असता तिने आपले नाव वत्सला दगडू तुरुकमाने (वय ६०, रा. काहकर, ता. शेनगाव, जि. हिंगोली) असे सांगितले. महिला पोलिसांच्या मदतीने तिची तपासणी केली असता चोरीस गेलेली पर्स, सोन्याची पोत, अंगठी, कानातील झुंबर, मोबाईल व रोख रक्कम असा संपूर्ण मुद्देमाल तिच्याकडून जप्त करण्यात आला.
या कारवाईनंतर वृद्ध फिर्यादी महिलेने आनंद व्यक्त करत रिसोड पोलिसांचे आभार मानले. “घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत न्याय दिला,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड व सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या पथकाने केली.


