वाशीम : गेल इंडिया लि. यांच्या सीएसआर सहाय्याने भारत विकास परिषद दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या वतीने १४ जून रोजी वाशिम येथे मोफत दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती १९ मे रोजी वाशिम विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

श्री चिंतामणेश्वर मठ संस्थान, वीरशैव लिंगायत समाज, वाशिम जिल्हा तसेच आमदार श्याम रामचरण खोडे यांच्या सहयोगाने स्वागत लॉन, पुसद नाक्याजवळ हे मोजमाप शिबिर पार पडणार असून यामध्ये ३५० दिव्यांगांना आधुनिक कृत्रिम मॉड्यूलर पाय मोफत बसविण्यात येणार आहेत. पत्रकार परिषदेत प्रो. डॉ. रविकांत कोल्हे यांनी शिबिराची माहिती दिली. दिव्यांग केंद्रप्रमुख विनय खटावकर यांनी आधुनिक मॉड्यूलर पायांविषयी माहिती देताना सांगितले की, या कृत्रिम पायांची किंमत ५० हजार रुपयांपेक्षा अधिक असून ते पारंपरिक जयपूर फूटपेक्षा अधिक हलके व आधुनिक तंत्रज्ञानयुक्त आहेत. हे पाय बसवल्यानंतर दिव्यांग व्यक्तींना चालणे, धावणे, पोहणे, वाहन चालविणे तसेच शेतीची कामे करणे सहज शक्य होणार आहे. आमदार श्याम रामचरण खोडे यांनी जास्तीत जास्त दिव्यांगांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. शिबिरासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून संबंधित क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
—
पुण्यातील विशेष शिबिराची गिनीज बुकमध्ये नोंद
भारत विकास परिषदेमार्फत गेल्या २५ वर्षांपासून दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरू आहे. एप्रिल २०२५ मध्ये पुणे येथे आयोजित विशेष शिबिरात एकाच दिवशी ८९२ दिव्यांगांना कृत्रिम पाय बसवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली होती.