बदनापूर : बदनापूर येथील कॅनरा बँक शाखेत सोन्याच्या दागिन्यांची चोरी करून बनावट सोने ठेवत सुमारे ७ कोटी ३१ लाख रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बँकेचे सहायक महाव्यवस्थापक केशवमूर्ती बी. व्ही. यांनी तक्रार दाखल केली असून, बँकेतीलच अधिकारी आणि संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे.

बँक अधिकारी, शाखा व्यवस्थापक, मूल्यमापकाविरुद्ध गुन्हा
बदनापूर : बदनापूर येथील कॅनरा बँक शाखेत सोन्याच्या दागिन्यांची चोरी करून बनावट सोने ठेवत सुमारे ७ कोटी ३१ लाख रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बँकेचे सहायक महाव्यवस्थापक केशवमूर्ती बी. व्ही. यांनी तक्रार दाखल केली असून, बँकेतीलच अधिकारी आणि संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे.

तपासात उघड झालेला प्रकार
बँकेच्या सुवर्ण कर्ज खात्यांचे त्रैमासिक पुनर्मूल्यांकन सुरू असताना २२ एप्रिल रोजी काही कर्ज पाकिटांमध्ये बनावट सोने आढळून आले. त्यानंतर सखोल चौकशी करण्यात आली असता मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले.
तक्रारीनुसार
संजय डोंगरे (बँक अधिकारी) यांचा प्रत्यक्ष चोरीत सहभाग दिसून आला.
विजेंद्र पाटणकर (शाखा व्यवस्थापक) यांनी सुरक्षा नियमांचे उल्लंघन व निष्काळजीपणा केला. तर प्रवीण बुन्हाडे (सुवर्ण मूल्यमापक) बनावट सोन्याला खरे प्रमाणित करून फसवणुकीत साथ दिली. या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक एम. टी. सुरवसे करत असून, आरोपींनी संगनमताने बँकेचा विश्वासघात केल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
बँकेतर्फे संबंधितांकडून अपहार झालेली रक्कम वसूल करून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
फसवणुकीचे स्वरूप
तपासादरम्यान खालील धक्कादायक बाबी समोर आल्या :
२२ कर्ज पाकिटांमध्ये बनावट सोने (अंदाजे किंमत : ३.७९ कोटी रुपये)
स्ट्राँग रूममधून ३० सोन्याची पाकिटे गायब (किंमत : ३.५२ कोटी रुपये)
यातून एकूण फसवणुकीचा आकडा ७.३१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
सीसीटीव्हीत कैद
गुरुवार, २३ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ११:२० वाजता बँकेतील अधिकारी संजय डोंगरे हे स्ट्राँग रूममधून सोन्याची पाकिटे काढून खिशात ठेवताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून आले. यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला.