वाशिम एलसीबीचे धाडसत्र; अवैध दारू, जुगारावर कारवाई

वाशिम : जिल्ह्यात अवैध दारू व जुगाराविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धाडसत्र सुरू केले असून ग्राम मोहगव्हाण येथे हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर छापा टाकून मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हजारो लिटर मोहसडा नष्ट; ७.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाशिम : जिल्ह्यात अवैध दारू व जुगाराविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धाडसत्र सुरू केले असून ग्राम मोहगव्हाण येथे हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर छापा टाकून मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांना ग्राम मोहगव्हाण (ता. कारंजा) येथील धरणाच्या काठावर गावठी हातभट्टी दारू तयार होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ११ मार्च रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परिसराला वेढा घालून छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनास्थळी झाडाझुडपांत व जमिनीत पुरून ठेवलेले मोहाच्या सड्याचे २० ड्रम, चार प्लास्टिक टाक्या व २० पिपे असा सुमारे ४,७०० लिटर मोहसडा आढळून आला. याची किंमत सुमारे ७ लाख १० हजार रुपये असून पंचासमक्ष त्याचा नाश करण्यात आला. दरम्यान, आरोपी जमिल रहेमान नौरंगाबादी (रा. मोहगव्हाण) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कारंजा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत प्रमोद गंगाराम चव्हाण याच्याकडून देशी-विदेशी दारू असा ७,३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत एकूण ७ लाख १७ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  याशिवाय वाशिम शहर व कारंजा शहर पोलीस ठाणे हद्दीत जुगार अड्ड्यांवर छापे टाकून १०,८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोउपनि शेखर मास्कर, बुद्धु रेधीवाले व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »