Wadi village shaken by cylinder explosion : शहरापासून जवळच असलेले वाडी गाव सिलेंडर स्फोटामुळे हादरले आहे. बंद असलेल्या एका हॉटेल मध्ये अचानक दुपारच्या वेळेस कमर्शियल सिलेंडरचा एकामागे एक असे दोन स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली.

विद्यार्थीनीने जीव वाचविण्यासाठी मारली बिल्डींगवरून उडी, दोघे गंभीर जखमी
खामगाव : शहरापासून जवळच असलेले वाडी गाव सिलेंडर स्फोटामुळे हादरले आहे. बंद असलेल्या एका हॉटेल मध्ये अचानक दुपारच्या वेळेस कमर्शियल सिलेंडरचा एकामागे एक असे दोन स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत एक टेलरिंग व्यवसायीक आणि एक विद्यार्थीनी गंभीर जखमी झाल्याचे घटना 17 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेदरम्यान उघडकीस आली आहे.
खामगाव शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ग्राम वाडी येथील हॉटेल आर्या मध्ये सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. सिलेंडरच्या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. वाडी परिसरात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था आहेत. याठिकाणी गर्व्हरमेंट पॉलिटेक्निक, आयटीआय, गो.से. महाविद्यालय आदी मोठे महाविद्यालये असून मोठ्या संख्येने खाजगी रूग्णालये सुध्दा आहे. त्यामुळे हॉटेल आर्या याठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी मेसच्या जेवणासाठी येतात. परंतु 17 एप्रिल रोजी हॉटेल बंद होती. दरम्यान सायंकाळी अचानक सिलेंडरच्या स्फोटाचा आवाज आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. लगेच हॉटेलमधून धूर बाहेर येत असल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी तातडीने न.प. च्या अग्निशमन दलाला पाचारण केले. थोड्या वेळाने आणखी दुसऱ्या सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे आगीने चांगलेच रौद्ररूप धारण केले होते. हॉटेल आर्या ही अरविंद गोविंद कोलते रा. वाडी यांच्या मालकीची असून त्यांनी गावातीलच इंगळे नामक व्यक्तीला मेस चालविण्यासाठी भाड्याने दिली होती. सदर हॉटेलमध्ये दोन कमर्शियल सिलेंडर हॉटेल चालकाने भरून ठेवले होते. हॉटेल आर्या च्या शेजारी नागरिकांची घरे आहेत. झालेल्या सिलेंडर स्फोटामुळे सर्व नागरिक घराबाहेर पडले होते. या आगीत संपूर्ण हॉटेल आणि त्यातील साहित्य जळून खाक झाले तर हॉटेल समोर उभी असलेली नवीन दुचाकीसुध्दा जळून खाक झाली. वेळीच अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून बंबाचा मारा करत आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. यावेळी घटनेची माहिती मिळताच शहर पोस्टेचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेवून हॉटेल परिसरातून नागरिकांना हटविले. तसेच घटनास्थळी नगराध्यक्ष पती सागर फुंडकर यांनी भेट देवून पाहणी केली.
जीव वाचविण्यासाठी विद्यार्थीनीने घेतली उडी
हॉटेल आर्याचे वर काही विद्यार्थी रूम घेवून भाड्याने राहत होते. स्फोटाचा आवाज आणि आगीने पेट घेतल्याने हॉटेलच्या वरील रूममधील तीन ते चार विद्यार्थी घाबरल्या होत्या. तर त्यातील एक विद्यार्थीनी कादंबरी गजानन सोनटक्के (20) हिने घाबरून स्वतचा जीव वाचविण्यासाठी वरून खाली उडी घेतली. त्यामुळे तिच्या तोंडाला गंभीर इजा होवून ती बेशुध्द झाली होती. तसेच इतर विद्यार्थीनींना रूममधून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. तर हॉटेलच्या बाजूला असलेले टेलर अशोक अनोकार (70) हे सुध्दा लागलेल्या आगीत भाजल्या गेल्याने गंभीर जखमी झाले. जखमींना नागरिकांनी तातडीने जवळील एका खाजगी रूग्णालयात उपचारार्थ भरती केले. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.


