Vaijapur News : शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करून रक्कम न देता फरार झालेल्या आरोपीस पोलीसांनी सोमवारी, 25 नोव्हेंबर रोजी रात्री अटक केली. तो सोलापूर येथे एका लॉजवर थांबलेला होता.
वैजापूर : शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करून रक्कम न देता फरार झालेल्या आरोपीस पोलीसांनी सोमवारी, 25 नोव्हेंबर रोजी रात्री अटक केली. तो सोलापूर येथे एका लॉजवर थांबलेला होता. सागर सुनिल राजपूत, रा. मकरमतपुरवाडी असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे. अटकेत असलेल्या सागर राजपूत याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा कांदा मार्केट मध्ये सागर राजपूत यांची साईट बालाजी ट्रेडींग कंपनी आहे. त्याने १ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत ४०६ शेतकऱ्यांकडुन कांदा खरेदी केला होता.या कांद्याची किंमत २ कोटी ५ लाख ७५ हजार ४९७ इतकी होती.हा कांदा खरेदी केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना रक्कम न देता सागर राजपूत हा फरार झाला होता.त्यामुळे बाजार समितीचे सचिव प्रल्हाद मोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कांदा व्यापारी सागर सुनिल राजपुत यांच्या विरूद्ध १४ नोव्हेंबर रोजी फसवणूकीचा गुन्हा वैजापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.तेव्हा पासून राजपूत हा फरार झाला होता.तो सोलापूर येथे एका लॉजवर लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार दिपक औटे, अंमलदार महेश बिरुटे , ज्ञानेश्वर मेटे, प्रशांत गिते यांच्या पथकाने सोमवारी रात्री ८ वाजता सोलापूर येथील एका लॉजमधुन राजपूत यास अटक केली. त्यास येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे हे करीत आहेत.